क्रीडा क्षेत्रातून घडतील विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 10:53 PM2018-10-31T22:53:56+5:302018-10-31T22:54:57+5:30
क्रीडा क्षेत्राकडे युवापिढी आकृष्ठ होत आहे. मागील चार वर्षांपासून विविध क्रीडा कौशल्यामध्ये युवक-युवतींनी देशाचे नाव उंचावले. या क्षेत्रातून आदर्श विद्यार्थी घडतील, असा आशावाद केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : क्रीडा क्षेत्राकडे युवापिढी आकृष्ठ होत आहे. मागील चार वर्षांपासून विविध क्रीडा कौशल्यामध्ये युवक-युवतींनी देशाचे नाव उंचावले. या क्षेत्रातून आदर्श विद्यार्थी घडतील, असा आशावाद केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने बुधवारी जिल्हा क्रीडा संकुलात राष्ट्रीय एकता दौड स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर, सतिश जोशी उपस्थित होते. ना. हंसराज अहीर म्हणाले, लोहपुरूष सरदार वल्लभाई पटेल यांच्या अथक परिश्रमामुळे देशाला स्वातंत्र मिळाले. त्यामुळे देशात राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी, याकरीता देशातील युवकांची भूमिका महत्त्वाची आहे. केंद्र शासनाने क्रीडा क्षेत्रातील चालना देण्यासाठी विविध योजना सुरू केल्या. यातून देशाच्या विविध भागातून दमदार खेळाडू तयार होत आहेत, असेही ना. अहीर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. खेमणार यांनीही जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा आढावा मांडला. पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी केले.
एकता दौडमध्ये सहभागी शाळेतील विद्यार्थी व युवकांनी दमदार सादर केले. जिल्हा क्रीडा संकुलाकरिता धावपथ व इतर सुविधांकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ना. अहीर यांच्याकडे क्रीडा अधिकाऱ्यांनी केली. संचालन कुंदन नायडू यांनी केले. विजेत्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. वाल्मिक खोब्रागडे, रोशन भुजाडे, तालुका क्रीडा अधिकारी अब्दुल मुस्ताक, राजु वडते, सचिन मांडवकर, राजेंद्र आव्हाड व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते
राष्ट्रीय एकता दौड स्पर्धेत जिल्हा अॅथेलेटिक्स असोशिएशन, जिल्हा प्रशिक्षण केंद्र कबड्डी, खो-खो, जिम्नॅस्टिक व विविध शाळांतील सुमारे ४०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. महेश वाढई, शिवाजी गोस्वामी, नाजुका मोहुर्ले, खुशी सातपैसे, समृद्धी आडे, किरण बोरसरे आदी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मनपातर्फे एकता दौड
चंद्रपूर : महानगरपालिकेतर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन तसेच एकता दौड हा उपक्रम पार पडला. रन फॉर युनिटी उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर तर अध्यक्षतेखाली महापौर अंजली घोटेकर यांनी एकता दौडला हिरवी झेंडी दाखवली. सकाळी ८ वाजता डॉ. धांडे हॉस्पिटल तुकूम, ताडोबा रोड येथून एकता दौड सुरू झाली. दरम्यान, अंतर पार करीत परत धांडे हॉस्पिटलजवळ समारोप करण्यात आला. राष्ट्रीय एकात्मता ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी युवावर्गाची भूमिका महत्त्वाची आहे. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव पाहता मुलांना मैदानाकडे वळविणे सर्वांची जबाबदारी असल्याचे मत ना. अहीर यांनी व्यक्त केले.