विद्यार्थ्यांनी बस अडविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:52 AM2021-03-04T04:52:46+5:302021-03-04T04:52:46+5:30
गोंडपिपरी : लाठी येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना गावाकडे परतण्यासाठी बसची फेरीच नाही. एसटी बसची फेरी वाढवा ,अशी मागणी विद्यार्थ्यांनी ...
गोंडपिपरी : लाठी येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना गावाकडे परतण्यासाठी बसची फेरीच नाही. एसटी बसची फेरी वाढवा ,अशी मागणी विद्यार्थ्यांनी वारंवार केली. याकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. अखेर विद्यार्थ्यांनी बस पुढेच ठिय्या मांडला. अर्धा तास बस रोखून धरली. हा प्रकार गोंडपिपरी तालुक्यातील लाठी येथे मंगळवारी घडला.
गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव, सोनापूर परिसरातील इयत्ता अकरावी आणि बारावीमध्ये शिकणारे विद्यार्थी शिक्षणासाठी लाठी गाव गाठतात. लाठीला जायला पहाटेची बसफेरी आहे. मात्र शाळेची सुटी झाल्यानंतर वेडगाव, सोनापूरला यायला बसफेरी नाही. त्यामुळे विद्यार्थांना खासगी वाहनांची वाट पाहत राहावे लागते. मागील काही दिवसांपासून माजी सभापती दीपक सातपुते यांच्या वाहनांनी विद्यार्थी गाव गाठत आहेत. बसफेरी वाढवा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी वारंवार केली. मात्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने या मागणीची दखल घेतली नाही. अखेर वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी बस पुढेच ठिय्या मांडून अर्धा तास बस अडवून ठेवली. लाठी उपपोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीपकुमार राठाेड यांनी विद्यार्थांची भेट घेऊन एसटी महामंडळाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. यावर तोडगा काढण्याचे वरिष्ठांनी आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी ठिय्या उठविला.