विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत
By admin | Published: March 4, 2017 12:42 AM2017-03-04T00:42:13+5:302017-03-04T00:42:13+5:30
आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रमाणात आणण्यासाठी व आदिवासी विद्यार्थ्यांचे स्थगिती व गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती लागू करण्यात आली.
शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार : सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती
चंद्रपूर : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रमाणात आणण्यासाठी व आदिवासी विद्यार्थ्यांचे स्थगिती व गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती लागू करण्यात आली. परंतु, शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे शैक्षणिक सत्र संपून दुसरे सत्र सुरु झाले असतानासुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा न झाल्यामुळे आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
आदिवासी मुले शाळाबाह्य राहू नये. शिक्षणाचा टक्का वाढावा यासाठी विविध योजना राबवित आहे. त्यासाठीच आदिवासी विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सूवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना आदिवासी विभागातंर्गत लागू करण्यात आली. या शिष्यवृत्तीमुळे आदिवासी विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात येण्यास मदत होईल. व शिक्षणात त्यांच्या गळतीचे प्रमाण कमी होईल, असा मुख्य उद्देश आहे. मात्र, शैक्षणिक सत्र संपूर्ण दुसरे सत्र सुरु होत असतानासुद्धा शिक्षण विभगाच्या दिरंगाईमुळे अद्यापही आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये सदर शिष्यवृत्ती जमा करण्यात आली नाही. मागील सत्रात संबंधीत शिष्यवृत्ती आॅनलाईन केल्याने सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर करुन आदिवासी विभागाने धनादेशासहीत जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे दिले. परंतु या बाबीकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
शैक्षणिक सत्र संपूनही दुसरे सत्र सुरु झाल्यानंतरही शिष्यवृत्ती मिळत नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू खरेदी करण्यास अडचण निर्माण होत आहे. पूर्वी विद्यार्थ्यांच्या शाळेतील मुख्याध्यापकाच्या खात्यावर सूवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती जमा करुन त्याचे वितरण केले जात होते. परंतु, यावर्षीपासून आॅनलाईन शिष्यवृत्ती केल्याने समस्या निर्माण झाली असून बँक खात्यावर शिष्यवृत्ती जमा करण्यास शिक्षण विभाग दिरंगाई दाखवत आहे.
मागील सत्रात प्राथमिक शिक्षक संघाने शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात यावे, ही मागणी लावून धरली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या खात्यावर आठ दिवसांत शिष्यवृत्ती जमा करण्याची शिक्षणाधिकाऱ्यांनी हमी दिली होती. परंतु तालुक्यातील विद्यार्थी बँकेमध्ये वारंवार फेरफटका मारत आहे. शिष्यवृत्ती जमा न झाल्याने रिकाम्या हाताने त्यांना परतावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. (नगर प्रतिनिधी)