विद्यार्थ्यांनो, हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:34 AM2018-05-03T01:34:58+5:302018-05-03T01:34:58+5:30
आयुष्याचा प्रवास यशासाठी असतो. त्यासाठी परीक्षा द्याव्याच लागतात. मात्र या परीक्षेतील यशासाठी तणावमुक्त राहा, हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क करा. तुमचे प्रयत्न तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचवू शकते, असा संदेश डॉ. प्रशांत ठाकरे यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आयुष्याचा प्रवास यशासाठी असतो. त्यासाठी परीक्षा द्याव्याच लागतात. मात्र या परीक्षेतील यशासाठी तणावमुक्त राहा, हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क करा. तुमचे प्रयत्न तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचवू शकते, असा संदेश डॉ. प्रशांत ठाकरे यांनी दिला. लोकमत व एज्युटेशनच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये रविवारी सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन एज्युटेशन डायरेक्टर मयूर वनकर यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून एज्युटेशनचे व्यवस्थापक मंजुषा हिंगाणे उपस्थित होते.
डॉ. प्रशांत ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सेमिनारमध्ये देशातील प्रमुख इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती दिली. त्याचबरोबर जेईई मेन, जेईई अॅडव्हान्स व ‘नीट’ परीक्षेचे बदलते स्वरूप यासंदर्भातही मार्गदर्शन केले. जेईई मेन, अॅडव्हान्स व नीटची तयारी विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे करावी, त्यात पालकांनी आपल्या पाल्याला कशाप्रकारे मार्गदर्शन करावे, याबाबत सविस्तर माहिती दिली.
दरम्यान, उपस्थित विद्यार्थ्यांनी डॉ. प्रशांत ठाकरे यांना विविध प्रश्न विचारून शंकांचे निराकरण केले. एज्युटेशन डायरेक्टर मयूर वनकर यांनी अभ्यास कसा करावा, पालकांनी मुलांकडे कशा प्रकारे लक्ष द्यावे, परिक्षेसाठी कशी तयारी करावी आदी विषयांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा उत्साह वाखणण्याजोगे होता. सेमिनारमध्ये २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा उपक्रम प्रमुख अमोल कडूकर यांनी केले़ लोकमत सखी मंच सयोजिका सोनम मडावी यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.