राजुऱ्यात साकारणार दोन कोटींची अभ्यासिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 11:18 PM2018-01-27T23:18:39+5:302018-01-27T23:19:01+5:30
क्रिकेटसह सर्वच क्रीडा प्रकारात ग्रामीण व छोट्या शहरातील खेळाडू राज्य तथा आंतराष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्याने देशाचे नाव उज्ज्वल करीत आहे.
आॅनलाईन लोकमत
राजुरा : क्रिकेटसह सर्वच क्रीडा प्रकारात ग्रामीण व छोट्या शहरातील खेळाडू राज्य तथा आंतराष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्याने देशाचे नाव उज्ज्वल करीत आहे. मर्यादित सुविधा असतानाही हे खेळाडू आपल्या खेळात अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघर्ष करीत आहे. या खेळाडूंना त्याच्या गावातच आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास हे खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करू शकतात. या सुविधा उपलब्ध करुन देण्याचा राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करीत आहे. याकरिता सर्व तालुकास्तरावर अत्याधुनिक क्रीडा संकुलचे निर्माण केले जात आहे, असे प्रतिपादन अर्थ, नियोजन तथा वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी येथे आयोजित जिल्हास्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्ध्येच्या उद्घाटनप्रसंगी केले.
चंद्रपुर जिल्ह्यातील अनेक खेळाडू आपल्या खेळात प्रवीण आहे. या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करीत आहो व त्याकरिता आपण कटिबंध अहो, असेही ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर होते. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी राजुरा येथे सरदार पटेलांच्या स्मृतीत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका निर्माण करण्याकरिता २ कोटी रुपये मंजूर करण्याची घोषणा केली. आ. अॅड संजय धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील समस्यांकडे ना. मुनगंटीवारांचे लक्ष वेधले. चंद्रपूर आ. नाना शामकुळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. मंचावर जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूर नगराध्यक्ष हरिश शर्मा, जि. प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, महिला बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, गोंडपिपरी पं. स. सभापती दीपक सातपुते, गोंडपिपरी नगराध्यक्ष संजय झाडे, उपनगराध्यक्ष चेतन गौर, सतीश धोटे, महेश देवकते, विनायक देशमुख, सिद्धार्थ पथाडे, स्वामी येरोलवार, अॅड अरुण धोटे, केशवराव गिरमाजी, बबन निकोडे, जि. प. सदस्य सुनील उरकुडे, सर्व पं.स., पालिका, नगर पंचायत, सदस्य उपस्थित होते. तत्पूर्वी विश्रामगृहापासून तिरंगा यात्रा काढण्यात आली. संचालन आशिष ताजने, निलेश गिरडकर, तर आभार प्रदर्शन सतीश धोटे ह्यांनी केले.