चंद्रपुरात एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:29 AM2018-04-11T01:29:06+5:302018-04-11T01:29:06+5:30
संपूर्णपणे सामाजिक दायित्व निधीतून चंद्रपूर येथे एसएनडीटी महिला विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्यात यावे. कुठल्याही निधीच्या दायित्वाशिवाय येत असलेल्या या प्रस्तावास उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विशेष बाब म्हणून मान्यता द्यावी....
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : संपूर्णपणे सामाजिक दायित्व निधीतून चंद्रपूर येथे एसएनडीटी महिला विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्यात यावे. कुठल्याही निधीच्या दायित्वाशिवाय येत असलेल्या या प्रस्तावास उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विशेष बाब म्हणून मान्यता द्यावी, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
सोमवारी मंत्रालयात यासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला कौशल्य विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्यासह सिम्बॉएसीस कौशल्य विद्यापीठाच्या मुजमदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. संपूर्णपणे सामाजिक दायित्व निधीचा उपयोग करून उपकेंद्र सुरु करावयाचे झाल्यास यासाठी लागणाऱ्या निधीचे प्रस्ताव अभ्यासपूर्ण पद्धतीने टाटा ट्रस्ट, पेट्रोलियम कंपन्या, जेएनपीटी, बजाज, डब्ल्यूसीएल, यासारख्या मोठ्या कंपन्यांकडे सादर करून या उपकेंद्रासाठी १०० ते १२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून केंद्र सरकारकडून या उपकेंद्रासाठी काही निधी मिळू शकतो का, याचाही अभ्यास केला जावा. चंद्रपूर हा नक्षलग्रस्त जिल्हा असून आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे येथील महिलांच्या विकासासाठी हे उपकेंद्र निर्माण होणे गरजेचे आहे.
उपकेंद्रासाठी जागेची उपलब्धता करून दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.