उपविभागीय अभियंत्यांवर संपूर्ण कार्यालयाचा सुरु आहे डोलारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 12:18 PM2024-08-22T12:18:35+5:302024-08-22T12:19:57+5:30
अख्या कार्यालयात केवळ एकच कर्मचारी : कोरपना येथील प्रकार
जयंत जेनेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना: कोरपना येथे जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभागाच्या कार्यालयाची स्थापना वर्षभरापूर्वी करण्यात आली. परंतु, उपविभागीय अभियंता व्यतिरिक्त एकाही कर्मचाऱ्याची अद्यापही नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सद्यस्थितीत कार्यालय नाममात्र ठरले आहे.
कोरपना तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या सनियंत्रणाची जबाबदारी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे असते. तालुका निर्मितीच्या ३२ वर्षांनंतरही कोरपना येथे हे कार्यालय स्थापन करण्यात आले नव्हते. येथील कार्यभार राजुरा येथून चालविला जायचा. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यावर अतिरिक्त व्याप असल्यामुळे कामे कासवगतीने व्हायची. या कार्यालयसंबंधी काम असल्यास वेळ व आर्थिक बाब सहन करून राजुरा जावे लागायचे. हा होणारा त्रास लक्षात घेता जून २०२३ ला कोरपना येथे स्वतंत्र जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभाग कार्यालय कार्यान्वित करण्यात आले.
यासाठी पंचायत समिती परिसरातील कर्मचाऱ्यांच्या सदनिकाची एक इमारतसुद्धा उपलब्ध करून देण्यात आली. परंतु कर्मचाऱ्यांच्या अभावाने सदर कार्यालय केव्हाही कुलूप बंदच दिसते. एकट्या उपविभागीय अभियंत्याचीच येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे राजुऱ्याचा अतिरिक्त कार्यभार आहे.
अशी आहेत रिक्त पदे
या कार्यालयात कनिष्ठ अभियंत्याची सहा पदे मंजूर असून यातील सहाही पदे रिक्त आहे. मंजूर असलेली ज्येष्ठ सहायक एक, कनिष्ठ सहायक दोन पैकी दोन, परिचरची दोन पैकी दोन ही पदे रिक्त आहे. यामुळे कार्यालयाचे कामकाज येथे अद्यापही प्रत्यक्षरीत्या सुरू होऊ शकले नाही. या अनुषंगाने लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन येथील रिक्त पदे तातडीने भरावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अधिकारी एकच कामे सर्वच ....
कोरपना येथील जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपवि भागाचे जिल्ह्यातील एकमेव असे कार्यालय असावे. की जेथे प्रमुख अधिकाऱ्यापासून अगदी परिचरपर्यंतची कामे एकाच प्रमुख अधिकारी पदाच्या व्यक्तीला रिक्त पदामुळे सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे. हे ही विशेष, मात्र याचा कामावर परिणाम होत असल्याचे जाणवत आहे.
सिंचाई उपविभाग कधी स्थापन होणार
कोरपना येथे जिल्हा परिषद बांधकाम, पाणीपुरवठा उपविभागाचे कार्यालय स्थापन झाली. परंतु सिचाई उपविभागाचे कार्यालय अद्यापही स्वतंत्ररित्या स्थापन झाले नाही. त्यामुळे या कार्यालय संबंधी कामे असल्यास राजुरा येथील कार्यालय गाठावे लागते आहे. स्वतंत्र कार्यालयअभावी तालुक्यातील सिचाईविषयक कामाला पाहिजे तशी गती सुद्धा मिळू शकत नाही, हे वास्तव आहे.