हिंस्र प्राण्यांना आळा घालण्यासाठी प्रस्ताव सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:37 AM2021-06-16T04:37:39+5:302021-06-16T04:37:39+5:30
विजय वडेट्टीवार : वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश चंद्रपूर : ब्रम्हपुरी वन विभागअंतर्गत बहुतांश क्षेत्र जंगलव्याप्त असल्याने जंगलालगतच्या गावांत हिंस्र ...
विजय वडेट्टीवार : वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश
चंद्रपूर : ब्रम्हपुरी वन विभागअंतर्गत बहुतांश क्षेत्र जंगलव्याप्त असल्याने जंगलालगतच्या गावांत हिंस्र प्राण्यांचा वावर असतो. तीन वर्षांत मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे हिंस्र प्राण्यांना आळा घालण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मदत व पुनर्वसनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी मुंबईतील बैठकीत दिल्या.
पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, ब्रम्हपुरी वन विभागअंतर्गत बहुतांश क्षेत्र जंगलव्याप्त आहे. या परिसरात ८५ वाघांचा अधिवास आहे. आतापर्यंत ५१ गावांत वाघांचे हल्ले झाले आहेत. या हिंस्र प्राण्यांना आळा घालण्याच्यादृष्टीने ब्रम्हपुरी वन विभागअंतर्गत गावालगतच्या जंगलव्याप्त क्षेत्राला जाळीचे कुंपण करावे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेंतर्गत ५० कोटींची तरतूद असलेला प्रस्ताव तयार करावा, अशाही सूचना दिल्या. वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत १९ नागरिकांचा मृत्यू झाला, तर ६९ नागरिक जखमी झाले आहेत. खरीप हंगाम सुरू झाला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने मदत द्यावी आणि शेतकऱ्यांना सौरऊर्जा कुंपण उपलब्ध करून देण्याचे निर्देशही यावेळी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.