आरोग्य विभागात नोकरी मिळविण्यासाठी सादर केले खोटे प्रमाणपत्र, दोघांविरोधात तक्रार दाखल
By साईनाथ कुचनकार | Updated: October 5, 2023 13:52 IST2023-10-05T13:49:43+5:302023-10-05T13:52:02+5:30
चंद्रपूर महापालिका आरोग्य विभागाची कारवाई

आरोग्य विभागात नोकरी मिळविण्यासाठी सादर केले खोटे प्रमाणपत्र, दोघांविरोधात तक्रार दाखल
चंद्रपूर : महापालिका आरोग्य विभागात झालेल्या कंत्राटी पदभरतीत अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून कंत्राटी नोकरी मिळविणाऱ्या दोघांविरुद्ध महापालिकेने सिटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये महापालिकेची दिशाभूल करून नोकरी मिळविल्याचे नमूद करण्यात आले आहे.
जुन महिन्यात महापालिका आरोग्य विभागातर्फे एएनएम या पदासाठी कंत्राटी तत्वावर १८ पदे भरण्यासंबंधी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. यात अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पात्र होण्यास इतर कागदपत्रांसोबतच अनुभव प्रमाणपत्र सुद्धा मागविण्यात आले होते. यात शीतल सिद्धार्थ मेश्राम यांनी सीएचएल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर यांचे तर प्रगती शंकर ढोले यांनी सिम्स हॉस्पिटल, बजाजनगर नागपूर येथे काम केले असल्याबाबत अनुभव प्रमाणपत्र सादर केले होते.
मनपाद्वारे या कागदपत्रांची वैधता तपासण्यास या हॉस्पिटल्सला संपर्क केले असता या नावाच्या उमेदवाराने येथे काम केले नसल्याचा म्हटले, नोकरी मिळविण्यास अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून चंद्रपूर महानगरपालिकेची दिशाभूल व फसवणूक केल्याने आरोग्य विभागामार्फत सिटी पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.