कोरोना काळातही शिक्षण शुल्कामध्ये भरमसाट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:30 AM2021-07-30T04:30:16+5:302021-07-30T04:30:16+5:30
एसडीओंना निवेदन : पालकामंध्ये संताप मूल : मागील वर्षी कोरोना संक्रमण होत असल्यामुळे शासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ...
एसडीओंना निवेदन : पालकामंध्ये संताप
मूल : मागील वर्षी कोरोना संक्रमण होत असल्यामुळे शासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. अनेक शाळांनी शिक्षण व इतर शुल्क घेण्यासाठी आभासी अभ्यासक्रम सुरू केले. शासनाने कोरोना काळात शिक्षण शुल्क वाढविण्यात येऊ नये असे निर्देश दिले असतानाही मूल येथील काही शैक्षणिक संस्थांनी शिक्षण शुल्कांमध्ये भरमसाट वाढ केलेली आहे. खासगी शाळा पालक संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन वाढीव शिक्षण शुल्क कमी करण्याची मागणी केली, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.
कोरोना संक्रमणात शिक्षण शुल्क वाढविण्यात येऊ नये, याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही मूल येथील काही शाळांनी शिक्षण शुल्कांमध्ये भरमसाट वाढ केलेली आहे, याबाबत पालक संघर्ष समितीच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शैक्षणिक शुल्क व इतर समस्या सोडविण्याची मागणी केली होती. याबाबत उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी १६ जुलैला सर्व खासगी शाळेच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन शिक्षणाधिकारी यांच्या १९ एप्रिल २०२१ च्या पत्राचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले. बैठकीमध्ये शिक्षण शुल्कामध्ये आम्ही वाढ केलेली नसल्याचे काही मुख्याध्यापकांनी सांगितले. मात्र, काही शाळांनी प्रत्यक्षात शिक्षण शुल्कामध्ये भरमसाट वाढ केलेली असून, उपविभागीय अधिकारी यांना मुख्याध्यापकांनी खोटी माहिती दिल्याचे पालक समितीने निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी सेंट ॲन्स हायस्कूलच्या शिक्षक-पालक समितीचे उपाध्यक्ष प्रा. चंद्रकांत मनियार, सदस्य संजय भुसारी, गिरीष कांचनकर, पालक संघर्ष समितीचे किशोर कापगते, प्रशांत समर्थ, विवेक मुत्यलवार, राकेश ठाकरे, मंगेश पोटवार, भोजराज गोवर्धन, मनीष येलट्टीवार, आदी उपस्थित होते.