दुपारपाळीच्या शाळांचे वेळापत्रक बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2016 01:00 AM2016-04-29T01:00:11+5:302016-04-29T01:00:11+5:30
सध्या चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान ४५ अंशावर पोहोचले आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक शाळा, कॉन्व्हेंट व्यवस्थापन ...
तीव्र उन्हाचा फटका : जिल्हा परिषद आज काढणार आदेश
चंद्रपूर : सध्या चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान ४५ अंशावर पोहोचले आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक शाळा, कॉन्व्हेंट व्यवस्थापन केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या नावावर भर उन्हात शाळा भरवित असल्याचे दिसून येत आहे. हा मुद्दा गुरूवारी पार पडलेल्या जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत गाजला. त्यामुळे शाळा, कॉन्व्हेंचे वेळापत्रक बदलवून सकाळी ७.३० ते १०.३० या वेळात शाळा भरविण्याचा आदेश शिक्षण विभाग शुक्रवारी काढणार आहे.
जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, शांताराम चौखे आणि ब्रिजभूषण पाझारे यांनी शाळांच्या वेळाबाबत प्रश्न उपस्थित करून शिक्षण विभागाला चाांगेलच धारेवर धरले. विदर्भात सर्वाधिक तापमानाचा जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याला ओळखले जाते. येथील तापमान दुपारच्या सुमारास ४५ अंश सेल्सीअस पर्यंत असते. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडणे धोक्याचे ठरत असून आतापर्यंत जिल्ह्यात चार जणांचा उष्मघाताने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिक दुपारी घराबाहेर पडण्यास घाबरतात.
मात्र एवढ्या तीव्र उन्हातही चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील अनेक शाळा, कॉन्व्हेंट भरविले जात आहेत. यामागे केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे भर उन्हातही विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे. उन्हाचा पारा वाढल्याने शेजारच्या तेलंगाना व आंध्र प्रदेशात शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात परिस्थती वेगळी असून अद्यापही शाळांना सुट्ट्या लागल्या नाही.
त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, शांताराम चौखे, आणि ब्रिजभुषण पाझारे यांनी जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत हा विषय लावून धरत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. दुपारी भरविण्यात येणाऱ्या शाळांचे वेळापत्रक बदलवून सकाळच्या सत्रात वर्ग घेण्याची मागणी या सदस्यांनी केली. त्यामुळे शाळा, कॉन्व्हेंटचे वेळापत्रक सकाळी ७.३० ते १०.३० या वेळात करण्यात येणार आहे. तसा आदेश शुक्रवारी शिक्षण विभागाकडून काढण्यात येणार आहे.
गुरूवारी पार पडलेल्या शिक्षण समितीच्या सभेला जिल्हा परिषद शिक्षण सभापती देवराव भोंगळे, शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षण समितीचे सदस्य, कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)