मुलीच्या घशात अडकलेले नाणे काढण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 10:31 PM2018-10-02T22:31:13+5:302018-10-02T22:33:18+5:30
एका तीन वर्षीय मुलीने खेळताना दोन रुपयांचे नाणे तोंडात टाकले. ते नाणे तिच्या घशात जावून अडकले. येथील नाक, कान व घसा तज्ज्ञ डॉ. मनीष मुंधडा यांनी दुर्बिणद्वारे किचकट शस्त्रक्रिया करून ते नाणे काढण्यात यश मिळविल्याने मुलीच्या पालकांनी सुटकेचा श्वास घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : एका तीन वर्षीय मुलीने खेळताना दोन रुपयांचे नाणे तोंडात टाकले. ते नाणे तिच्या घशात जावून अडकले. येथील नाक, कान व घसा तज्ज्ञ डॉ. मनीष मुंधडा यांनी दुर्बिणद्वारे किचकट शस्त्रक्रिया करून ते नाणे काढण्यात यश मिळविल्याने मुलीच्या पालकांनी सुटकेचा श्वास घेतला.
मूल तालुक्यातील भेजगाव येथील प्राजक्ता अंकुश ठाकूर या तीन वर्षीय मुलीला सोमवारी सायंकाळी घरी आलेल्या पाहुण्याने जाताना दोन रुपयांचे नाणे खाऊसाठी दिले. तिने ते नाणे तोंडात टाकले. त्यानंतर ती तशीच पलंगावर झोपली. तोंडात नाणे ठेवून झोपताच नाणे तिच्या घशात जावून अडकले.
याची माहिती कुटुंबीयांना होताच त्यांनी एकच धावपळ सुरू झाली. तिला लगेच मूल येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना चंद्रपूरला घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
प्राजक्ताला तिच्या आजी-आजोबाने सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास येथील डॉ. मनीष मुंधडा यांच्याकडे आणले.
डॉ. मनीष मुंधडा यांनी तपासणी केली असता नाणे घशात अन्ननलिकेत फसून असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्या मुलीवर दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अर्ध्या तासाच्या या किचकट शस्त्रक्रियेनंतर ते नाणे काढण्यात डॉ. मुंधडा यांनी यश मिळविले. या शस्त्रक्रियेत कुठलिही जखम होत नसल्याने प्राजक्ताला मंगळवारी सकाळी सुटी देण्यात आली.