औद्योगिक दूषित पाणी जैविक शोषक पदार्थाद्वारे शुद्ध करण्याचा चंद्रपुरात यशस्वी प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:16 AM2018-01-01T11:16:48+5:302018-01-01T11:17:27+5:30
चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या मान्यतेने जलबिरादरीने प्रायोगिक तत्वावर लगतच्या रानवेंडली नाल्यातून इरई नदीत जाणाऱ्या दूषित पाण्यावर जैविक शोषक पद्धतीने पाणी शुद्ध करण्याचा प्रयोग केला आणि तो यशस्वी ठरला.
राजेश भोजेकर ।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात शेकडो कारखाने आहेत. या कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर दूषित नदी-नाल्यांमध्ये सोडले जाते. यामुळे जलचर प्राण्यांचा जीव जातो, शिवाय गावे व शहरवासीयांसाठी असलेल्या पिण्याच्या पाण्याचेही स्त्रोत विषारी होत आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या मान्यतेने जलबिरादरीने प्रायोगिक तत्वावर लगतच्या रानवेंडली नाल्यातून इरई नदीत जाणाऱ्या दूषित पाण्यावर जैविक शोषक पद्धतीने पाणी शुद्ध करण्याचा प्रयोग केला आणि तो यशस्वी ठरला. औद्योगिक दूषित पाणी स्वच्छ करण्याचा हा राज्यातला पहिला प्रयोग असल्याचे सांगितले जात आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्रातून रानवेंडली नाला वाहतो. हा नाला पुढे चंद्रपूर शहरासाठी जीवनदायिणी असलेल्या इरई नदीला मिळतो. या पाण्यात वीज निर्मिती केंद्र, वेकोलि वसाहत व अन्य दूषित पाणी त्यात मिसळते. मागील काही वर्षांपासून नाल्याचे पाणी लाल असून ते रसायनयुक्त आहे. या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर मासोळ्या मरतात. अशा अनेक तक्रारीही झाल्या. प्रकरण पोलिसातही गेले. जैविक शोषण पदार्थाने (सीएसटी बायो अॅडझार्बंट) पाणी शुद्ध करणे सहज शक्य आहे. या पाण्यावर इतर पाण्याप्रमाणे काही प्रक्रिया करून ते पिण्यायोग्यही करणे शक्य असल्याचा प्रस्ताव जलबिरादरीचे जिल्हा संयोजक संजय वैद्य, रसायन शास्त्राचे प्रा. टी. डी. कोसे, प्रा. डॉ. योगेश दुधपचारे यांनी चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे यांच्याकडे सादर केला. त्यांनी तो मंजुर करताच महिनाभरात हा प्रयोग यशस्वी झाला. महाजनकोचे उपमुख्य अभियंता परचाके, रसायन शास्त्रज्ञ डी. एम. शिवणकर, डॉ. विजय येवूल, पडघम, गजानन नवले व देवानंद धानोरकर यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रयोगासाठी विजेची गरज भासत नाही. अत्याधुनिक संयंत्राचीही गरज नाही. जैविक असल्यामुळे खर्चिक नाही. प्रा. डॉ. कोसे यांनी इंड्रस्ट्रीयल वेस्ट वॉटर ट्रिटमेंट या विषयावर केलेल्या संशोधनातून हा प्रयोग पुढे आला आहे. कोणत्याही उद्योगांचे दूषित पाणी या प्रयोगामुळे शुद्ध करता येणे शक्य असल्याचे प्रा. टी.डी. कोसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शोषकाचा गुणधर्म
जैविक सोलूलोस पदार्थाची शोषण क्षमता अल्पशी रासायनिक प्रक्रिया करून कित्येक पटीने वाढविण्यात आली आहे. त्यामुळे हा शोषक जड विषारी धातूचे आयन्स तसेच अल्कलाईन अर्थ मेटल्स आयन्स हे यशस्वीरित्या ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत शोषले जात आहे. यामुळे औद्योगिक दूषित वा सांडपाणी सदर पदार्थाच्या संपर्कात आल्यास मिनिटात पाणी प्रदूषण विरहीत करते. नागपूर येथे गेल्या जून महिन्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय पाणी परिषदेत या प्रयोगाचे प्रात्याक्षिक वैज्ञानिकांसमक्ष करून दाखविले होते.