‘त्या’ शिक्षकांची अशीही मानवता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:31 AM2021-02-09T04:31:15+5:302021-02-09T04:31:15+5:30
नागभीड : कानपा-भुयार या राष्ट्रीय महामार्गावर रविवारी नागाभीड येथील त्या शिक्षकांनी जी मानवता दाखविली त्या मानवतेचे चांगलेच कौतुक ...
नागभीड : कानपा-भुयार या राष्ट्रीय महामार्गावर रविवारी नागाभीड येथील त्या शिक्षकांनी जी मानवता दाखविली त्या मानवतेचे चांगलेच कौतुक होत आहे.
त्याचे झाले असे की, अचानक हरणाचा कळप कानपा-भुयार हा राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना पलीकडून एक दुचाकीस्वार येतो. अचानक समोर हरणांचा कळप दिसल्याने त्याचा तोल जातो व गाडी स्लिप होऊन तो पडतो. त्या व्यक्तीच्या पडण्याने हरणे बुजाडतात आणि कळपातील एक हरीण खाली पडून गंभीर जखमी होते. मात्र बघे त्या व्यक्तीला व हरणाला मदत करण्याऐवजी सेल्फी काढण्यात धन्यता मानतात. त्याचवेळी पवनी येथे औषधोपचारासाठी जात असलेले विनोद सातव, अशोक नरुले व दिवाकर हे नागभीड येथील तीन शिक्षक गर्दी पाहून थांबले. ही गर्दी बाजूला सारत क्षणाचाही विलंब न लावता त्या व्यक्तीला व हरणाला स्वत:च्या गाडीने भुयार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. जखमी व्यक्तीवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू झाल्यानंतर या शिक्षकांनी लगेच पवनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी भुयार येथे दाखल झाले. त्यांनी हरणाला पुढील उपचारासाठी पवनीला घेऊन गेले.