ब्रह्मपुरी-नागभीड रस्त्यावर वाहनांची ऐसीतैसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:19 AM2017-09-01T00:19:02+5:302017-09-01T00:19:19+5:30
राज्य मार्गाचे राष्ट्रीय मार्गामध्ये रूपांतर होत असलेल्या ब्रह्मपुरी-नागभीड रस्त्याची दयनीय अवस्था पाहून वाहनचालकांच्या अंगावर काटे उभे राहत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : राज्य मार्गाचे राष्ट्रीय मार्गामध्ये रूपांतर होत असलेल्या ब्रह्मपुरी-नागभीड रस्त्याची दयनीय अवस्था पाहून वाहनचालकांच्या अंगावर काटे उभे राहत आहेत. नेमके रस्ता रूपांतराविषयी कोणते काम चालले आहे, हे समजण्यापलीकडे असल्याने ब्रह्मपुरी-नागभीड रस्त्यावर चाललंय काय, असा प्रश्न अनेकजण एकमेकांना विचारत आहेत.
रस्त्यांचा विकास म्हणजे राष्ट्राचा, राज्याचा विकास. रस्त्याचा विकास करीत असताना अडचणी येणार, हे पण तेवढेच खरे. परंतु, या रस्त्यावर गेल्या वर्षभरापासूनच अडचणी कायम आहेत. रस्त्याचा कोणताही भाग सद्य:स्थितीत वाहतुकीस योग्य नाही ही आजची शोकांतिका आहे. या रस्त्याच्या कामाची सुरवात कुठून करण्यात आली आहे, हे समजण्यापलीकडे आहे. मध्येच रस्ता खोदून ठेवणे, दुसºयाच ठिकाणी रस्ता तयार करणे, पूल बांधणे व पुलावरून वाहतूक सुरू करणे, वळण देणे, वळण दिलेला रस्त्यावर मोठमोठ्या खिंडार पडणे, उर्वरीत डांबरीकरणाची वाट लागणे, चिखलफेक होऊन दुचाकी वाहनधारकांचे कपडे व वाहनाची एैसीतैसी होणे, अशा प्रकारामुळे सध्या हा रस्ता प्रवासासाठी नकोसा झाला आहे.
या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. मात्र या रस्त्याचे भविष्य अंधारात असल्याचे दिसून येत आहे. काही वाहनधारक याबाबत पूर्वीचाच रस्ता व पूर्वीचे विभाग किमान योग्य रस्ता तयार करून देत होते. पण राष्ट्रीय रस्ता बनविण्याच्या प्रकारात हा रस्ता वर्षभरापासून त्रासदायक ठरला आहे. वाहनांची मोडतोड, वाहनांची ऐसीतैशी होत असून त्याची नुकसान भरपाई कोण देणार, याचा कोणीच वाली दिसून येत, असे बोलत आहेत. खरे तर या रस्त्याच्या कामावर कुणाचेही अंकुश नसल्याने या रस्त्यावरून पुन्हा किती दिवस नरक यातना सोसावे लागणार, निश्चित नाही. त्यामुळे नेमके काय चाललंय म्हणण्याची वेळ तालुक्यातील वाहनधारकांवर आली आहे.
बेलपातळी-रूपाळामेंढा रस्त्यावर मोठा खड्डा
तालुक्यातील रूपालामेंढा व बेलपातळी रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा जीवघेणा ठरत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रस्ता दुरूस्त करून खड्डा बुजविण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.