‘त्या’ वाणाचे असे झाले नामकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 11:35 PM2018-06-04T23:35:48+5:302018-06-04T23:36:00+5:30
धानाचे वेगवेगळे विविध प्रकारचे वाण आहेत. त्यातील एचएमटी हे एक प्रसिद्ध नाव. हे वाण दादाजी खोब्रागडे यांनी शोधून काढले. पुढे या वाणाला व्यापक प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. दिसायला चांगला टवटवीत, खायला चवदार आणि शिजविल्यानंतर मोकळा मोकळा दाणेदार भात, असे या एचएमटीचे वैशिष्ट्य.
वसंत खेडेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : धानाचे वेगवेगळे विविध प्रकारचे वाण आहेत. त्यातील एचएमटी हे एक प्रसिद्ध नाव. हे वाण दादाजी खोब्रागडे यांनी शोधून काढले. पुढे या वाणाला व्यापक प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. दिसायला चांगला टवटवीत, खायला चवदार आणि शिजविल्यानंतर मोकळा मोकळा दाणेदार भात, असे या एचएमटीचे वैशिष्ट्य.
हे वाण बाजारात आल्यानंतर धानपट्ट्यातील बहुतांश शेतकरी मग याच वाणाचे धान आपल्या शेतात घेऊ व पिकवू लागले. एचएमटी तांदूळ खरेदीकडे लोकांचा लवकरच कल वाढू लागला. या वाणाला त्याच्यातील गुणांमुळे प्रतिष्ठाही लाभली. एचएमटी वाणाचे तांदूळ विकत घेणे एकप्रकारे प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले होते. याच एचएमटी धानाच्या संशोधनाने दादाजी खोब्रागडे यांचे नाव प्रकाशझोतात आले. त्यांच्या या वाणाची दखल राष्टÑीय व आंतरराष्टÑीय स्तरावर घेतली गेली. दादाजी खोब्रागडे यांनी संशोधित केलेल्या या वाणाला एचएमटी हे नाव कसे पडले. कुणी दिले हे नाव. त्याचा एक इतिहास आणि सोबत एक योगायोगही आहे. दादाजींनी आपल्या संशोधित व अभ्यास वृत्तीने धानाचा नवीन वाणाचा (जातीचा) शोध लावला. त्यांनी त्यांचे पहिले उत्पादन आपल्या शेतात घेतले. हे वाण उच्चप्रतिचे असल्याचे व ते लोकांना चांगले आवडेल, हे त्यांच्या लक्षात आले. आपल्या शेतात पिकलेल्या या नवीन वाणाचे नमूने घेऊन जवळच्या तळोधी बाळापूर येथील आपल्या नेहमीच्या ओळखीतील धानगिरणी मालकाकडे जावून या धानाचे वैशिष्ट्य त्यांनी त्यांना सांगितले. या नवीन वाणाला दादाजींनी कोणतेही नाव दिले नव्हते. पारखी धानगिरणी मालकाला या नवीन वाणाची उत्कृष्ट पोत लक्षात आली. या वाणाची प्रशंसा करीत दादाजींना त्यांनी या वाणाचे नाव काय ठेवले, असे विचारले. वाणाला नाव ठेवणे तर गरजेचे आहे. कोणते नाव ठेवावे, हा प्रश्न दादाजींपुढे उभा झाला आणि नावाबाबत ते विचार करू लागले. या विचारात असताना त्यांचे लक्ष धानगिरणी मालकाजवळील एचएमटी या कंपनीच्या घडाळ्याकडे गेले. त्याकाळी एचएमटी या कंपनीने बनविलेल्या घड्याळाच्या डायलवर ठळकपणे दिसत असलेले ‘एचएमटी’ हे नाव दादाजींनी उद्गारले. या वाणाला एचएमटी हेच नाव द्यायचे, असे म्हणत दादाजींनी या वाणाचे तिथल्या तिथेच नामकरण केले. योगायोगाने मिळालेले हे नाव पुढे सर्वमुखी झाले.