चार सोसायट्यांमधील धान खरेदी अचानक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 06:00 AM2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:00:43+5:30
शासनाने यावर्षी तालुक्यातील काही आदिवासी सोसायट्यांना व पणन महासंघाने संस्था संचालित करीत असलेल्या भात गिरण्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत. या सोसायट्यांचे हमीभाव १८३५ अधिक ५०० बोनस व २०० रुपये सानुग्रह देत असल्याने शेतकरी आपले धान सोसायटी व पणन केंद्रावरच विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : कृउबास आणि खुल्या बाजारापेक्षा पणन महासंघ व आदिवासी सोसायट्यांमध्ये धानाला जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा धान विक्रीचा कल सोसायट्यांकडे वाढला आहे. नागभीड तालुक्यात आतापर्यंत आठ आदिवासी सोसायट्या व पणन महासंघाच्या दोन केंद्रामार्फत धान खरेदी सुरू होती. मात्र बारदान्याअभावी दोन आदिवासी सोसायट्यांनी तर पणन महासंघाच्या दोन केंद्रांनी धान खरेदी बंद केली आहे.
नागभीड तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापैकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येते. यानंतर शेतकरी आपले धान विक्रीसाठी काढत असतात, असा आजवरचा अनुभव आहे.
शासनाने यावर्षी तालुक्यातील काही आदिवासी सोसायट्यांना व पणन महासंघाने संस्था संचालित करीत असलेल्या भात गिरण्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत. या सोसायट्यांचे हमीभाव १८३५ अधिक ५०० बोनस व २०० रुपये सानुग्रह देत असल्याने शेतकरी आपले धान सोसायटी व पणन केंद्रावरच विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धानाचे भाव एक हजार ९०० ते २ हजार रूपयांच्या पलिकडे नसल्याची माहिती आहे.
दरामधील ही तफावत लक्षात घेता बहुतांशी शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आपला मोर्चा आदिवासी सोसायट्या व पणन महासंघाच्या केंद्राकडे वळविला आहे. मात्र गोविंदपूर सोसायटीने बारदाना उपलब्ध नसल्यामुळे धान खरेदी बंद केली आहे. तर सावरगाव सोसायटीने धान ठेवण्यासाठी जागा आणि बारदानाही उपलब्ध नसल्याने धान खरेदी बंद केली असल्याची माहिती संबंधित सुत्राने दिली आहे.
नागभीड व कोर्धा केंद्र बंद
पणन महासंघाकडून नागभीड व कोर्धा येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र १३ दिवसांपासून बारदान्याअभावी या दोन्ही केंद्रांची धान खरेदी बंद आहे. याठिकाणी बारदाना हा कलकत्ता येथून येतो, अशी माहिती आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही दोन्ही केंद्रे अतिशय महत्त्वाची आहेत. विचारणा करण्यासाठी शेतकरी याठिकाणी येत असले तरी त्यांच्या पदरी निराशाच येत आहे.
चुकारेही अडले
धानाची खरेदी झाल्यानंतर सात दिवसात शेतकºयांना सात दिवसात चुकारे दिल्या गेले पाहिजे, असा नियम असल्याचे समजते. मात्र नागभीड केंद्रावर गेल्या अनेक दिवसांपासून चुकारेच दिल्या गेले नाही. ४ जानेवारी रोजी याठिकाणी शेवटचा पेमेंट आला होता. त्यानंतर पेमेंटच आले नसल्याची माहिती आहे.