फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीत मंगळवारी मुनगंटीवार भरणार उमेदवारी अर्ज!
By राजेश भोजेकर | Published: March 24, 2024 07:21 PM2024-03-24T19:21:35+5:302024-03-24T19:21:54+5:30
मुंनगटीवार हे २६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता गांधी चौकातून आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून नामांकन भरणार आहेत.
चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून चंद्रपूर लोकसभेसाठी सुधीर मुंनगटीवार हे २६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता गांधी चौकातून आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून नामांकन भरणार आहेत. माझी उमेदवारी हे कोणत्याही उमेदवाराच्या विरुद्ध नसून कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराचा पराजय करण्यासाठी नाही; या लोकसभेच्या विकासाचा विजय व्हावा विकासाची गती वाढावी, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.
नामांकन भरताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीच्या वतीने राजेंद्र जैन, शिवसेनेच्या वतीने नागपूर विभागाचे प्रमुख किरण पांडव व आरपीआय आठवले गट आरपीआय जोगेंद्र कवाडे यांचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. आवेदन अर्ज दाखल करण्यासाठी आशीर्वाद यात्रेमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी राहणार आहे.
३४ वर्षानंतर लोकसभेच्या रिंगणात
सुधीर मुनगंटीवार यांनी १९८९ मध्ये आयुष्यात महाविद्यालयामध्ये विद्यार्थी असताना पहिली लोकसभा लढवली. दुसऱ्या निवडणुकीत १९९१ मध्ये सामोरे गेले. पण साधारणतः १९९५ पासून आजच्या क्षणापर्यंत चंद्रपूर विधानसभेतून तीनदा आमदार झाले. तीनदा बल्लारशा विधानसभेचे नेतृत्व केले. ३४ वर्षानंतर पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. केंद्र सरकारच्या योजना गावापर्यंत पोहोचवणे. राज्यामध्ये असणारा २९- ३० वर्षाचा अनुभव व परिचय या माध्यमातून गावागावात केंद्राच्या योजना पोहोचवत त्या गावाचा सर्वंकष सर्वांगीन करण्याचा संकल्प केला असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.