शालूचा मोबाईल उलगडणार आत्महत्येचे रहस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:13 AM2018-01-12T00:13:21+5:302018-01-12T00:13:58+5:30
घुग्घुस येथील भाजपच्या पंचायत समिती सदस्य शालू शिंदे यांच्या आत्महत्येनंतर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र आत्महत्येमागील नेमके कारण अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे पोलीस सांगत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : घुग्घुस येथील भाजपच्या पंचायत समिती सदस्य शालू शिंदे यांच्या आत्महत्येनंतर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र आत्महत्येमागील नेमके कारण अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे पोलीस सांगत आहे. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शालू शिंदे यांच्या मोबाईलच्या माध्यमातून पोलीस या प्रकरणातील रहस्य उलगडणार असल्याचे बोलले जात आहे.
शालू शिंदे या आपल्या परिवारात आनंदी जीवन जगत होत्या, अशी माहिती चर्चेतून पुढे येत आहे. अशातच त्यांनी मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याने घुग्घुसमध्येच नव्हे, तर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. आनंदी जीवन जगत असताना त्यांना आत्महत्या करण्याची गरज का भासली, असा प्रश्न जनतेला पडला आहे.
त्यांच्या आत्महत्येमागे नक्कीच काहीतरी मोठे कारण असल्याचा सूरही घुग्घुसमध्ये ऐकायला मिळत आहे. या प्रकरणी शालू शिंदे यांचे पती विवेक शिंदे यांनी शालू यांचा मोबाईल घुग्घुसचे ठाणेदार आमले यांना चौकशीसाठी ताब्यात दिला. तसेच पोलिसांनी घरातील मंडळींचेही बयाण नोंदवून घेतले आहे. मात्र याचा उलगडा करण्यास पोलिसांनी नकार दिला. यामुळे या घटनेचे रहस्य आणखीच वाढले आहे.
चर्चेच्या आधारे शालू यांनी आत्महत्येपूर्वी मोबाईलवरून कोणाशीतरी संभाषण केले होते. यानंतर काहीवेळातच आत्महत्या झाल्याचेही बोलले जात आहे. या अनुषंगाने शालू यांच्या मोबाईलचे एकूणच कॉल डिटेल्स तपासात घेतले तर आत्महत्येच्या रहस्यावरून पडदा हटण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
एक पंचायत समिती सदस्य एकाएकी आत्महत्या करते. यामागे नक्कीच काहीतरी गंभीर कारण असावे, असा सूर असल्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून नेमके सत्य पुढे आणण्याचे आव्हान घुग्घुस पोलिसांपुढे आहे.