पीडित महिला बनणार मनोधैर्य योजनेतून सक्षम
By admin | Published: January 25, 2017 12:47 AM2017-01-25T00:47:19+5:302017-01-25T00:47:19+5:30
बलात्कार, बालकावरील लैगिंक अत्याचार, अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनवर्सन करुन..
शासनाचे क्रांतिकारी पाऊल : तीन लाखांपर्यंत अर्थसहाय्य
चिमूर : बलात्कार, बालकावरील लैगिंक अत्याचार, अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनवर्सन करुन त्यांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने ‘मनोधैर्य योजना’ कार्यान्वित केली आहे. या योजनेच्या सहाय्याने या पीडित महिलांना सक्षम बनण्यास मदत होणार आहे.
या योजनेतून पीडितांना किमान दोन ते तीन लाखापर्यंतची आर्थिक मदत देण्याची तरतुद केली आहे. पीडित महिलेला सर्व शक्तीनिसी आधार देवून तिला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देवून तिला सन्मानाने उभे करण्यासाठी मनोधैर्य योजना शासनाचे क्रांतिकारी पाऊल म्हणून ओळखले जात आहे. बलात्कार, बालकावरील लैंगिक अत्याचार, अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला, बालके व त्यांच्या वारसदारांना तातडीने आर्थिक मदत आणि मानसोपचाराची सेवा उपलब्ध करून देणे, तसेच त्यांना गरजेनुसार निवारा शिक्षण व व्यावसायीक प्रशिक्षण या सारख्या आधार सेवा उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
या योजने अंतर्गत बलात्कार व बालकावर लैगिंक अत्याचार प्रकरणी दोन लाख रुपये व विशेष प्रकरणामध्ये कमाल तीन लाख रूपयाचे अर्थसहाय्य देण्याची तरतुद आहे. त्याचप्रमाणे अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकास अंधत्व आल्यास, त्यांचा चेहरा विद्रुप झाला अथवा कायमचे अपंगत्व आल्यास तीन लाख रुपये आणि अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकांना ५० हजार रुपये इतक्या अर्थसहाय्यायची तरतुद या योजनेत करण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभागामार्फत या योजनेनुसार अर्थसहाय्य देण्याची तरतुद आहे. या योजनेमुळे समाजात विकृत मानसीकतेला बळी पडलेल्या महिलांना नव्याने समाजात सक्षण होण्यास मदत होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)