सरकारची काटकसर, पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:21 AM2021-06-02T04:21:54+5:302021-06-02T04:21:54+5:30
एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत ग्रामीण, आदिवासी प्रकल्पातील ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना, ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील ...
एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत ग्रामीण, आदिवासी प्रकल्पातील ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना, ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील सर्वसाधारण बालकांना, कुपोषित बालकांना तसेच गरोदर आणि स्तनदा मातांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांना सकस आहार मिळावा यासाठी पूरक पोषण आहार दिला जातो. मागील वर्षापर्यंत बालकांना गरम तसेच ताजा आहार दिला जात होता. मात्र कोरोना संकटानंतर धान्य पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यानुसार लाभार्थींना धान्य दिले जात असले तरी खाद्यतेल मात्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या लाभार्थींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
या योजनेंतर्गत चवळी, चना, मूग डाळ, मसूर डाळ, गहू, मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, साखर आदी दिले जात आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी अर्धा किलो खाद्यतेल दिले जात होते. मात्र मागील काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे हा पुरवठा बंद करीत त्याऐवजी एक किलो साखर दिली जात आहे. यामुळे चव गोड झाली असली तरी फोडणी नसल्यामुळे लाभार्थींत संताप व्यक्त केला जात आहे.
बाॅक्स
पूरक पोषण आहार योजनेचे एकूण लाभार्थी
६३,९४३
सहा महिने ते ३ वर्ष वयोगटातील एकूण लाभार्थी
५०,३४४
गरोदर व स्तनदा महिला लाभार्थी- २०,१२८
बाॅक्स
काय काय मिळते ?
चवळी, चना, मूग डाळ, मसूर डाळ, गहू, मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, साखर.
कोट
मागील चार महिन्यांपासून शासनाने खाद्यतेलाऐवजी साखरेचा पुरवठा करण्याचे आदेश दिला आहे. त्यानुसार पोषण आहार पुरवठा होत आहे. जिल्ह्यातील लाभार्थींना योग्य आणि नियमित आहार पुरवठा केला जात आहे.
-संग्राम शिंदे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
महिला व बालकल्याण, जि.प., चंद्रपूर
कोट
फोडणी कशी द्यायची?
कोरोना सुरू झाला तेव्हापासून घरीच पोषण आहारातील धान्य दिले जात आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून तेल मिळत नाही. आता तेलाचे भाव वाढले आहे आणि तेच मिळत नाही. त्याबदल्यात साखर दिली जात आहे. शासनाने साखर न देता तेल द्यावे.
एक लाभार्थी
कोट
मागील चार महिन्यांपासून तेल न देता साखर दिली जात आहे. त्यामुळे पोषण आहाराची फोडणी आम्ही कशी द्यायची. याबाबत अंगणवाडीताईंना सांगितले, तर सरकारकडूनच येत नसल्याचेे त्या उत्तर देतात.
एक लाभार्थी