चंद्रपूरकरांवर सूर्य कोपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:27 PM2018-05-19T23:27:29+5:302018-05-19T23:28:19+5:30

चंद्रपुरात मागील काही दिवसांपासून सूर्याचा कोप सुरू आहे. जणू चंद्रपूरच्या डोक्यावरच तो मुक्कामाला असावा, असा भास होत आहे. पारा ४६ अंशाखाली येण्याचे नावच घेत नसल्याने चंद्रपूरकर वैतागले आहे. आज शनिवारी तर सूर्याने चंद्रपूरकरांना होरपळून काढण्याची कोणतीच कसर सोडली नाही. तब्बल ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची शनिवारी नोंद झाली. हे तापमान आजवरचे सर्वाधिक ठरले आहे.

Sun caps on Chandrapurkar | चंद्रपूरकरांवर सूर्य कोपला

चंद्रपूरकरांवर सूर्य कोपला

Next
ठळक मुद्देपारा ४७.८ अंश सेल्सिअस : यंदाचे सर्वाधिक तापमान, चंद्रपूरकर हैराण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपुरात मागील काही दिवसांपासून सूर्याचा कोप सुरू आहे. जणू चंद्रपूरच्या डोक्यावरच तो मुक्कामाला असावा, असा भास होत आहे. पारा ४६ अंशाखाली येण्याचे नावच घेत नसल्याने चंद्रपूरकर वैतागले आहे. आज शनिवारी तर सूर्याने चंद्रपूरकरांना होरपळून काढण्याची कोणतीच कसर सोडली नाही. तब्बल ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची शनिवारी नोंद झाली. हे तापमान आजवरचे सर्वाधिक ठरले आहे.
यासोबतच ब्रह्मपुरीत ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, जिल्हाभरच शनिवारी अधिक तापमान असल्याचे बोलले जात आहे. ‘हॉट सिटी’ म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरचा उन्हाळा राज्यात प्रसिद्ध आहे. सर्वाहून अधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातच होत असते. यंदाही चंद्रपूर जिल्ह्याची ही ओळख कायमच राहणार, असे चित्र आतापासूनच दिसू लागले आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच जिल्ह्यात उन्हाचे चटके बसू लागतात, असा अनुभव दरवर्षीच नागरिकांना येतो. मात्र यावेळी फेब्रुवारी महिना साधारण गेला. आणि मार्च महिन्यातही फारसे तापमान नव्हते. होळी झाल्यानंतर तापमानात किंचित वाढ झाली. दरम्यान अधेमधे झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याचे तापमान घटले होते. मात्र अवकाळी पावसाचा गारवा फार काळ टिकला नाही. एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यापासून ऊन्ह तापू लागले. एप्रिल महिन्यातच सूर्याचा पारा ४५ अंशापार गेला होता.
आता मे महिना लागताच सुर्याने आपला प्रकोप दाखविणे सुरू केले आहे. सुर्याने अक्षरश: आग ओकणे सुरू केले आहे. या वाढत्या उष्णतामानामुळे जवजीवनावरच परिणाम झाला आहे. सकाळी ९ वाजतापासून उन्हाचे चटके असह्य होऊ लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
एरवी गजबजलेले चंद्रपुरातील मुख्य रस्ते दुपारी ओस पडू लागले आहेत. सध्या काही शाळा-महाविद्यलयांनाही सुट्या लागल्या असल्याने दुपारी शहरात निरव शांतता पसरल्याचे दिसून येत आहे. नागरिक सायंकाळीच बाहेर निघणे पसंत करीत आहेत. एकूणच नागरिकांनी उन्हाचा चांगलाच धसका घेतला आहे.
मागील चार-पाच दिवसांपासून चंद्रपूरवर जणू सूर्याचा कोप सुरू आहे, असेच दिसून येत आहे. सातत्याने पारा ४६ अंशा पार चालला आहे. गुरुवारी तर ४७.६ आणि शुक्रवारी ४७.४ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली. शनिवारी तर पाऱ्याने सर्वच सीमा ओलांडून टाकल्या. शनिवारी चंद्रपुरात ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. किमान तापमानही ३१. २ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. ब्रह्मपुरीही शनिवारी तापलेलीच होती. येथे ४७.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. आणखी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तविला असल्याने चंद्रपूरकरांना धसका घेतला आहे.
तप्त उन्हामुळे जलस्रोत आटले
जसजशे उन्ह तापू लागले आहे, तसे जलाशय, नदी, तलाव-बोड्यातील पाणी आटू लागले आहे. आता तर तप्त उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटत चालले आहे. ग्रामीण भागातील अनेक बोअरवेल्स बंद आहेत. विहिरी आटत चालल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोरपना, जिवती तालुक्यात तर पाण्याची भिषण टंचाई जाणवत आहे. चंद्रपुरातील घरगुती विहिरींनीही तळ गाठला आहे.
दुप्पटाही काम करेना !
उन्हापासून बचाव करण्यासाठी नानाविध क्लुप्त्या लढविल्या जात आहे. तोंडाला दुपट्टा बांधल्याशिवाय कुणीच बाहेर निघत नाही. त्यामुळे दुपट्यांच्या दुकानांना सुगीचे दिवस आले आहे. असे असले तरी दुपट्टा बांधल्यानंतरही आता उन्हाचे चटके बसू लागले आहेत. ठिकठिकाणी ऊसाचा रस, नारळ पाणी, ताड, लिंबू पाणी यांची दुकाने लागली आहेत. थंडा आईस गोला, कुल्फी यांचीही दुकाने रस्त्यावर दिसून येत असून या दुकानांमध्ये नागरिकांचीही झुंबड दिसून येत आहे.
सरपटणारे प्राणी, पक्षी दिसेना !
मागील तीन दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. पारा सातत्याने वाढत आहे. येणाºया काही दिवसात तापमान आणखी वाढणार असल्याचे संकेत आहेत. या वाढत्या तापमानामुळे सरपटणारे प्राणी, पक्ष्यांनाही धोका निर्माण झाला आहे. एरवी शहरात ठिकठिकाणी दिसणारे पक्षी आता फार कमी दिसत आहे. सरपटणाºया प्राणी थोडाफार गारवा असेल त्या ठिकाणी दडी मारली आहे. त्यामुळे तेदेखील दिसून येत नाही.
काळजी घेणे गरजेचे
सध्या चंद्रपुरात उष्णतेची लाट सुरू आहे. या वाढत्या तापमानात नागरिकांनी विशेषत: वृध्द व्यक्ती, लहान बालके, गरोदर माता व उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, अत्यावश्यक असल्याशिवाय उन्हात जाऊ नये, सैल कपडे घालावे, थंड वातावरणात रहावे, दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उन्हात काम करणे टाळावे, अस्वस्थपणा, थकवा, शरीर तापणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ ही लक्षणे उष्माघाताची असून असे आढळल्यास थंडगार पाण्याने आंघोळ करावी, थंड जागेत आराम करावा, भरपूर थंड पाणी प्यावे किंवा लिंबू पाणी, आंब्याचे पन्हे प्यावे, परिश्रमाचे काम करू नये, रुग्णालयात उपचार करून घ्यावा.

Web Title: Sun caps on Chandrapurkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.