सुपर फूड असणारे चिया शेतकऱ्यांसाठीही सुपर; ‘आत्मा’कडून जिल्ह्याभरात जनजागृती
By परिमल डोहणे | Published: February 7, 2024 07:12 PM2024-02-07T19:12:14+5:302024-02-07T19:12:37+5:30
पिकाची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी आत्मा कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती.
चंद्रपूर: पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतकऱ्यांनी भरघोस उत्पन्न देणारे व आर्थिक नफा कमवून देणाऱ्या पिकांची लागवड करावी, यासाठी आत्माकडून नावीण्यपूर्ण पीक लागवडीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सुपर फूड मानले जाते. कमी उत्पादन खर्च आणि मोठी मागणी यामुळे शेतकरी चांगली आर्थिक कमाई करू शकतात. प्रायोगिक तत्त्वावर कोरपना तालुक्यातील बाखर्डी येथील युवा शेतकऱ्याने चिया पिकाची लागवड केली आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या प्लॉटला आत्माच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्लॉटची पाहणी केली. तसेच, सुपर फूड मानले जाणारे चिया बियाणे शेतकऱ्यांसाठीही सुपर ठरू शकते, असे मार्गदर्शन केले.
जिल्ह्यात खरीप हंगामात भात, सोयाबीन, कापूस व रब्बी हंगामात हरभरा व गहू या पारंपरिक पिकांची लागवड करतात. परंतु, बदलत्या हवामानाचा परिणाम, निसर्गाचा लहरीपणा यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे उत्पादन कमी होत आहे. शिवाय उत्पादित होणारा माल व त्याकरिता करण्यात येणारा खर्च याचा ताळमेळ बसत नाही. शेतीवरील वाढलेला खर्च व त्यातून मिळणारा कमी नफा यामुळे शेतकऱ्यांना शेती अधिक जोखमीची झाली आहे. यावर पर्याय म्हणून विविध शाश्वत उत्पन्न देणारी पिके लागवड करण्याचा प्रयत्न कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मामार्फत सुरू आहे. खरीप व रब्बी हंगामात पारंपरिक पिकाला पर्यायी पीक म्हणून मोहरी, जवस सारखी तेल बिया उत्पादने, तसेच चिया लागवडीसारखे प्रयोग घेण्यात आले. या पिकाची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी आत्मा कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती. त्यातून धडे घेऊन कोरपना तालुक्यातील बाखर्डी येथील शेतकऱ्यांनी चिया बियाण्यांची लागवड केली. आत्माच्या संचालक प्रीती हिरळकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत शेतकऱ्याला मार्गदर्शन केले.
खरेदीदार-विक्रेते यांचीही घालून दिली भेट
चियामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे बाजारात चांगला भाव आहे. चिया बियाणे वनस्पतीस एक विशेष वास असतो. याच्या पानांवर केस वाढतात यामुळे प्राणी त्यापासून दूर राहतात. त्यामुळे नुकसान टळते. मागील महिन्यात आत्माने घेतलेल्या कार्यशाळेत शेतकऱ्यांना चिया पीक विकत घेणारे खरेदीदार, तसेच विक्रेता यांच्यासोबत चर्चा व समन्वय घडवून आणल्याने त्याची खरेदी-विक्रीसुद्धा सोयीची झाली आहे.
काय आहे चिया बियाणे
चिया ही एक उबदार हवामानातील वार्षिक औषधी वनस्पती आहे. हे बियाणे काळ्या प्रकारचे असते. साधारणपणे पाच फुटांपर्यंत ही झाडे वाढत असतात. पौष्टिक आणि आरोग्य फायद्यांमुळे सद्य:स्थितीत हे बियाणे लोकप्रिय झाले आहे.