अंधश्रद्धांमुळे वन्यजीवांच्या अस्तित्वाला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:19 AM2021-06-17T04:19:57+5:302021-06-17T04:19:57+5:30
संजय अगडे तळोधी बा. : ढोंगी बुवा-बाबा समाजात गैरसमज पसरवून प्राण्यांच्या अवयवांचाही गोरखधंदा राजरोसपणे करतात. पैशाचा पाऊस पाडणे, कजली ...
संजय अगडे
तळोधी बा. : ढोंगी बुवा-बाबा समाजात गैरसमज पसरवून प्राण्यांच्या अवयवांचाही गोरखधंदा राजरोसपणे करतात. पैशाचा पाऊस पाडणे, कजली काढून गुप्तधन मिळवून देणे, असाध्य आजार दूर करणे, दैवी शक्ती प्राप्त करून देणे आणि लैंगिक क्षमता वाढवणे यांसारख्या गोष्टींकरिता लोकांना वेगवेगळे प्राणी, पक्षी यांचे अवयव उपलब्ध करून द्यायला सांगतात व या नादातच हजारो प्राण्या-पक्ष्यांची शिकार आणि तस्करी केली जाते. जिल्ह्यात अनेकदा असे प्रकार उघडकीस येत असल्याने यावर आळा घालणे आता गरजेचे झाले आहे.
यात वेगवेगळ्या प्राण्यांबद्दल वेगवेगळ्या अंधश्रद्धा आपल्या देशात रुजविण्यात आलेल्या आहेत. साप, बेडूक, कासव, सारखे सरीसृप. कावळा, घुबड, वटवाघूळ यासारखे पक्षी. वाघ, अस्वल, खवल्या मांजर यांसारख्या प्राण्यांबद्दलही वेगवेगळ्या अंधश्रद्धा आहेत. यात मांढूळ या सापाबद्दल, तो दोन तोंड असलेला साप आहे, अशी फार मोठी अंधश्रद्धा लोकांमध्ये पसरलेली आहे. आणि कजली काढणे, गुप्तधन शोधणे याकरिता या सापाचा वापर करतात. त्यामुळे याची मागणी खूप आहे व याची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते. वास्तविक एकच तोंड असलेल्या या सापाची शेपटीकडील भागही तोंडासारखाच आखूड असल्यामुळे दुरून पाहताना दोन तोंड असल्याचा भास या सापाबद्दल होतो. आणि याची मागणी आणि किंमत ही लाखोमध्ये असल्यामुळे ढोंगी बाबा आणि तस्कर त्याच्या शेपटीच्या बाजूला जळालेल्या अगरबत्तीने किंवा गरम तारेने डोळ्यांसारखे व्रण करतात व दोन तोंड असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करून पैसे लुबाडतात. त्याचबरोबर कासवांबाबतही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे. पैशाचा पाऊस पाडणे, गुप्तधन शोधण्याकरिता २१ नखी कासव, पाच किलो वजनाचा काळा कासव, यांच्या शोधात अनेक कासव पकडली जातात. आणि फार मोठ्या प्रमाणात या कासवांची तस्करी केली जाते. पैशाच्या पाऊस पाडण्याच्या नादात हजारो कासव मारले जातात. मात्र आजपर्यंत कुठेही पैशाचा पाऊस पडून कोणीही श्रीमंत झाल्याच्या घटना घडलेल्या नाही. मात्र हजारो लोक कारागृहात गेलेले आहेत.
अशाप्रकारे पर्यावरणात महत्त्वाचा घटक असलेले अनेक प्राणी हे या ढोंगी बुवा-बाबांच्या समाजात पसरलेल्या गैरसमज, अंधश्रद्धा व प्राण्यांच्या अवयवांच्या मागणीमुळे दरवर्षी हजारो प्राणी, पक्षी, साप पकडून त्यांची तस्करी केली जाते व त्यांची हत्या केली जाते. फक्त शिकार करणाऱ्यांवरच नाही तर त्या भोळ्याभाबड्या लोकांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात फसविणाऱ्या या ढोंगी बुवा, बाबांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार व सोबतच जादूटोणाविरोधी कायदा २०१३नुसार कठोर कारवाई करण्याची मागणी वन्यजीवप्रेमी यशवंत कायरकर यांनी केली आहे.
बॉक्स
घुबड, वटवाघूळही अंधश्रद्धेचे बळी
घुबड, वटवाघूळ यासारखे पक्षीही अंधश्रद्धेचे बळी पडत आहेत. घुबड हा पक्षी लक्ष्मीचे वाहन समजून त्याचा वापर हा अघोरी पूजा करण्याकरिता केला जातो. मटक्याचे आकडे पाहणे, गुप्तधन शोधणे, वशीकरण करणे यासारख्या अंधश्रद्धेमुळेच या पक्ष्याच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. मात्र हा उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणारा शेतकऱ्यांचा मित्रच आहे.
बॉक्स
वाघांच्या अवयवांचाही वापर
वाघ, अस्वल, खवले मांजर यांच्यासारख्या प्राण्यांच्या बाबतीत गैरसमज, अंधश्रद्धा पसरवून त्यांच्या अवयवांना वापरून ढोंगी बाबा अघोरी पूजेसाठी करतात आणि त्याकरिता या प्राण्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. वाघाची नखे आणि दात यांचे तावीज बनवून गळ्यात अटकवून शारीरिक दुर्बलता दूर करण्याकरिता, मिशांचा वापर जेवणामध्ये करून आपल्या वैऱ्याला संपवणे, वाघाचे सूळ आणि नख वापरून चांगले दिवस येण्याकरिता, तर त्याच्या हाडांची भुकटी करून खाल्ल्याने मर्दानी ताकद वाढते, असे गैरसमज आहेत.