बुरूड कामगारांना तत्काळ हिरवा बांबू पुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:30 AM2021-09-27T04:30:14+5:302021-09-27T04:30:14+5:30
गडचांदूर : औद्योगिक शहर गडचांदूर येथे अनेक वर्षांपासून बुरूड कामगार वास्तव्य करीत आहेत. त्यांना उदरनिर्वाहाकरिता रोज हिरवा बांबू लागतो, ...
गडचांदूर : औद्योगिक शहर गडचांदूर येथे अनेक वर्षांपासून बुरूड कामगार वास्तव्य करीत आहेत. त्यांना उदरनिर्वाहाकरिता रोज हिरवा बांबू लागतो, बुरूड कामगारांना उत्तमरीत्या जीवन जगता यावे, यासाठी महाराष्ट्र शासन दरवर्षी प्रति कार्डधारकांना पंधराशे नग हिरवा बांबू पुरवठा करण्याचा शासन निर्णय आहे; परंतु वनविभागाच्या चुकीच्या धोरणामुळे शासन निर्णयाचा चुराडा होत आहे.
बुरूड कामगारांना उदरनिर्वाहाकरिता हिरवा बांबू पुरवठा करावा, अशी लेखी मागणी उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग कार्यालय चंद्रपूर व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे गेल्या एक वर्षापासून संतोष पटकोटवार यांनी केली आहे. मात्र, वनविभाग या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असून, निवड आश्वासन देत आहे. यामुळे बुरूड कामगारांची दिवसेंदिवस बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. त्यांना नाइलाजाने गैरमार्गाचा वापर करून जंगलातील हिरवा बांबू तोडून आणावा लागत आहे. पंधरा दिवसांच्या आत वनविभागाकडून हिरवा बांबूपुरवठा न झाल्यास बुरूड कामगारांना सोबत घेऊन आमरण उपोषण करू, असा इशारा बुरूड समाजाचे कोरपना तालुका सचिव तथा शेतकरी संघटनेचे सरचिटणीस संतोष पटकोटवार यांनी दिला आहे.