आधार संस्थेकडून मिळाला स्वर्गयात्रेला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:06 PM2019-01-08T23:06:51+5:302019-01-08T23:07:30+5:30
मृत्यू अटळ आहे आणि मृत्यू कुणाची वाट बघत नसतो. परिवारातील सदस्याचे जाणे सर्वांना चटका देणारे असते. कुटुंबातील व्यक्तीच्या परिवाराला सांत्वनेसोबतच आर्थिक मदत देण्याच्या हेतूने आधार संस्थेने स्वर्ग यात्रा निधीची नवीन संकल्पना साकारली. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संस्थेचे पदाधिकारी घरी जाऊन सांत्वन करून चार हजार रुपयांची मदत करतात.
राजू गेडाम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : मृत्यू अटळ आहे आणि मृत्यू कुणाची वाट बघत नसतो. परिवारातील सदस्याचे जाणे सर्वांना चटका देणारे असते. कुटुंबातील व्यक्तीच्या परिवाराला सांत्वनेसोबतच आर्थिक मदत देण्याच्या हेतूने आधार संस्थेने स्वर्ग यात्रा निधीची नवीन संकल्पना साकारली. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संस्थेचे पदाधिकारी घरी जाऊन सांत्वन करून चार हजार रुपयांची मदत करतात.
मूल येथील संतोष रानगरवार, प्रशांत गटलेवार व अन्य पदाधिकाऱ्यांनी आधार संस्थेची सामाजिक दृष्टिकोणातून स्थापन केली. आधार संस्थेअंतर्गत कुटुंबातील सर्व व्यक्तींकडून २२ रुपये सभासद शुल्क घेतल्या जाते. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना चार हजार रुपयांची मदत देऊन सांत्वना करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. जात आणि धर्माचा भेद न मानता सर्वांना समान मानल्याने स्वर्ग यात्रा निधीची सभासद संख्या वाढत असल्याचे दिसून येते. अल्पावधीत सुरु झालेल्या या उपक्रमात १ हजार ४९७ व्यक्तींची नोंदणी झाली. आतापर्यंत २ लाख ४४ हजार ८६० रुपये जमा झाले आहे. १५ सभासदांच्या कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाल्याने घरी जाऊन आर्थिक मदत देण्यात आली. सभासद संख्या वाढल्यानंतर १० हजार रुपयांपर्यंत मदत करण्याचा संकल्प संस्थेच्या पदाधिकाºयांनी केला आहे. जाती व धर्माच्या पलीकडे जाऊन समधर्म समभाव जोपासत आधार संस्थेने सुरू केलेला उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक घटकांचा विचार केला तर माणुसकीची चळवळ सुरू होते. आर्थिक फायदा व्हावा, यासाठी काही मंडळी धडपडत असताना दिसतात. ही संस्था यापासून कोसो दूर आहे. गरीब कुटुंबियांसाठी काही तरी देणे लागते, ही भावना संपत आहे. समाजातील लहान व गरजू व्यक्तीला आधार देणे तेवढेच गरजेचे आहे. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर निर्माण होणारी आर्थिक अडचण आधार संस्थेच्या मदतीने काही प्रमाणात दूर होते. स्वर्ग यात्रा निधीच्या सदस्यांमध्ये वाढ होत आहे. सभासद संख्या वाढल्यास पुन्हा काही नव्या योजनांची सुरूवात केली जाणार आहे. ही संस्था प्रेरणादायी असून सर्वांनीच पाठबळ दिल्यास माणुसकीची प्रतिष्ठा वाढेल. याच कारणांमुळे शहरातील समाजातील जबाबदार घटक या संस्थेकडे आशावादी दृष्टीने बघत आहे.