रेशनसाठी आधार कार्ड सक्तीचे
By admin | Published: October 22, 2016 12:43 AM2016-10-22T00:43:15+5:302016-10-22T00:43:15+5:30
नोव्हेंबर महिन्यापर्यंत जे रेशनकार्डधारक लाभार्थी आधार कार्ड क्रमांक धान्य दुकानदारास उपलब्ध करुन देणार नाहीत,...
दुकानदाराकडे नोंदणी करण्याचे आवाहन : अन्यथा रेशनकार्ड होणार रद्द
चंद्रपूर : नोव्हेंबर महिन्यापर्यंत जे रेशनकार्डधारक लाभार्थी आधार कार्ड क्रमांक धान्य दुकानदारास उपलब्ध करुन देणार नाहीत, त्याचे नाव रेशन कार्डमधून वगळण्यात येवून त्यानंतर त्यांचे नाव पुन्हा समाविष्ट करण्यात येणार नाही. त्यामुळे सर्व पिवळे व केशरी कार्डधारकांनी आधार क्रमांकाची दुकानदाराकडे नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
१३ आॅक्टोंबरच्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ च्या योजनेअंतर्गत अन्नधान्य मिळत असलेल्या सर्व अंत्योदय, अन्न योजना व प्राधान्य कुटूंबाचे लाभार्थी कार्डधारकाच्या रेशन कार्डवर समाविष्ट सर्वच व्यक्तीच्या आधार क्रमांकाची नोंदणी करण्यात येत आहे. आधार कायदा-२०१६ चे कलम ७ नुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट असलेल्या व नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांकडे आधार क्रमांक असणे आता अनिवार्य करण्यात आलेले आहे.
सद्य:स्थितीत जे लाभार्थी शासकीय अन्नधान्याचा लाभ घेत आहेत. त्यांच्या रेशनकार्डात समाविष्ट सर्व सदस्यांचे आधारकार्ड संबंधीत स्वस्त धान्य दुकानदाराकडे जमा केल्याची खात्री करुन घ्यावी. कुटूंबातील काही सदस्यांकडे आधार क्रमांक नसल्यास त्यांनी आधार केंद्रावर जावून आधार कार्ड नोंदणी करुन आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक दुकानदारास द्यावे.
तसेच केंद्र शासनाने एलपीजी धारकांना सबसिडी सोडण्याबाबत केलेल्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर या अधिनियमाअंतर्गत समाविष्ट पिवळे व केशरी कार्डधारकांनी रेशनवरील सवलतीच्या दरामध्ये मिळणाऱ्या अन्नधान्याची स्वत:साठी आवश्यकता नसेल तर त्यांना अन्नधान्य नाकारण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. त्यांनी स्वेच्छेने रेशनवरील अन्नधान्य नाकारण्याचा पर्याय स्वीकारावा व तसे पत्र संबंधीत तहसिल कार्यालयास द्यावे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)