विरोधी बाकावर असलो तरी चांगल्या कामासाठी सहकार्य
By Admin | Published: November 26, 2014 11:03 PM2014-11-26T23:03:00+5:302014-11-26T23:03:00+5:30
जीवनात अनेक चढउतार येतात. समाजातील शेवटच्या माणसाचे दु:ख आपल्याला माहित आहे. आपणही त्या दु:खातून गेलो आहे. वेदना काय असतात, याची वास्तविकता आपल्याला चांगली ठाऊक आहे.
मिट द प्रेस : विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्या भावना
चंद्रपूर : जीवनात अनेक चढउतार येतात. समाजातील शेवटच्या माणसाचे दु:ख आपल्याला माहित आहे. आपणही त्या दु:खातून गेलो आहे. वेदना काय असतात, याची वास्तविकता आपल्याला चांगली ठाऊक आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या समस्या सुटाव्या, अशी आपली भावना आहे. विरोधी बाकावर असलो तरी चांगल्या कामासाठी सत्ताधाऱ्यांना सहकार्य करायचे. विरोधासाठी विरोध करायचा नाही, अशी भूमिका आपली असल्याचे मत काँग्रेसचे विधीमंडळ उपगटनेता आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित मीट द प्रेसमध्ये ते बोलत होते.
विधीमंडळ उपगटनेता म्हणून पक्षाने आपल्यावर जबाबदारी टाकली आहे. ही जबाबदारी आपण समर्थपणे पेलणार आहो. चांगल्या गोष्टी सभागृहात आणण्यावर आपला भर आहे. सरकार स्थिर राहावे, जनतेची कामे व्हावे, अशी आपली इच्छा आहे. सत्तेत नाही म्हणून लाजायचे नाही तर जनतेचे कामे करीत रहायचे, असे आपले मत आहे.
सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी आहे. राज्यात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करणे गरजेचे आहे. भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासन दिली.
मात्र आता ते विसरत आहे. कापूस, सोयाबीन, धान आदी पिकांना योग्य भाव देवू असे निवडणुकीपूर्वी भाजपाचे नेते सांगत होते. आता मात्र त्यांनी आश्वासन पाळले नाही. कवडीमोल भावात सोयाबीन, धानाची खरेदी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम करीत आहे. त्यांना त्यांची चूक लक्षात आणून देणे गरजेचे आहे.
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात २०१५ मध्ये १० हजार नागरिकांना दृष्टी देण्याचे आपले ध्येय आहे. यासाठी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च आपण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ आपण आहो. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे वेगळा विदर्भ त्वरित केल्यास आपणाला आनंद आहे. मात्र चार वर्ष सत्ता भोगायची आणि शेवटच्या वर्षी निवडणुकीच्या तोंडावर वेगळा विदर्भ करायचा, अशी भूमिका सत्ताधाऱ्यांची असू शकते, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
यावेळी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आमदार वडेट्टीवार यांचा श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रमोद उंदिरवाडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ तथा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संचालन आशिष आंबाडे, प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे सचिव मंगेश खाटीक तर, आभार जितेंद्र मशारकर यांनी मानले.(नगर प्रतिनिधी)