राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेच्या तयारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 10:15 PM2018-12-16T22:15:48+5:302018-12-16T22:16:19+5:30
१९ वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धांचे आयोजन स्थानिक लोकमान्य विद्यालयाच्या परिसरात ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०१९ दरम्यान होऊ घातल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : १९ वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धांचे आयोजन स्थानिक लोकमान्य विद्यालयाच्या परिसरात ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०१९ दरम्यान होऊ घातल्या आहेत. या सामन्यांच्या आयोजनाची पाहणी करण्याकरिता जिल्ह्याधिकाऱ्यांनी शनिवारी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार व आमदार बाळू धानोरकर यांनी आयोजकांना विविध सुचना दिल्या.
बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, नगराध्यक्ष अहेतेशाम अली, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार, तहसीलदार सचिन गोसावी, न.प.चे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते. सदर स्पर्धेमध्ये देशातून मुलींचे ३५ संघ सहभागी होणार आहेत. त्यांच्या निवासाची आणि सुरक्षिततेच्या संदर्भात काटेकोर सूचना, आ. धानोरकर, महेश्वर रेड्डी आणि जिल्हाधिकाऱ्यांची यावेळी आयोजकांना दिल्या. भोजन व्यवस्था, वैद्यकीय उपचार, स्पर्धेच्या ठिकाणी अग्निशामक दल, अखंडीत विद्युत पुरवठा यासंबंधी आढावा घेण्यात आली. प्रेक्षक गॅलरी उभी करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर, लोक शिक्षण संस्था वरोरा, चंद्रपूर जिल्हा मल्टीपर्पज आणि व्हॉलीबॉल असोसिएशन व वरोरा स्पोटर्स फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. बैठकीचे प्रास्ताविक आणि आयोजनाची विस्तृत माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी दिली. आभार गजानन जिवतोडे यांनी मानले. संस्थेचे कार्यवाह श्रीकृष्ण पाटील, डॉ. मिलिंद देशपांडे उपस्थित होते.