संरक्षण मंत्रालयाच्या चमूकडून सैनिकी शाळेच्या जागेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2016 01:46 AM2016-01-08T01:46:46+5:302016-01-08T01:46:46+5:30
चंद्रपुरात सैनिकी शाळा होऊ घातली असून या नियोजित शाळेच्या जागेच्या पहाणीसाठी केंद्रीय चमू दाखल झाली आहे.
तीन वर्षांत उभारणी : देशातील असेल ही २६ वी शाळा
चंद्रपूर : चंद्रपुरात सैनिकी शाळा होऊ घातली असून या नियोजित शाळेच्या जागेच्या पहाणीसाठी केंद्रीय चमू दाखल झाली आहे. गुरूवारी या चमूने जागेची पहाणी केली असून या जागेसाठी आणि शाळेच्या उभारणीसाठी सहमती दिर्शविली आहे.
केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या सैनिकी स्कुल सोसायटीचे कॅप्टन जी. रामबाबू व अवर सचिव एन. बी. मणी यांच्यासमवेत ना. मुनगंटीवार यांनी आज विसापूरनजिक असलेल्या सैनिकी शाळेच्या जागेची पाहणी केली. ही चमू आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहेत.
देशातील २६ वी आणि राज्यातील ही दुसरी सैनिकी शाळा चंद्रपुरात उभारली जाणार असून चंद्रपूरसह गडचिरोली, भंडारा व गोंदिया या सारख्या आदिवासी व नक्षल प्रभावित जिल्ह्यातील मुलांना या शाळेच्या माध्यमातून देशसेवा करण्याची संधी प्राप्त होणार आहे.
देशात असलेल्या अनेक सैनिकी शाळापेक्षा चंद्रपुरातील जागा प्रशस्त व सुंदर असल्याचा अभिप्राय संरक्षण विभागाचा असल्याची माहिती आहे. येत्या तीन वर्षात सैनिकी शाळेचे काम पूर्ण होणार आहे.
या जागेची संरक्षण भिंत तात्काळ उभारण्याची आणि या जागेच्या सौंदर्यीकरणाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना ना. मुनगंटीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
विदर्भाच्या विकासात भर पडेल - ना. मुनगंटीवार
चंद्रपुरातील या सैनिकी शाळेमुळे विदर्भाच्या विकासात भर पडेल, असा विश्वास वित्तमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी चंद्रपुरात व्यक्त केला. राज्याच्या विधानसभेने चंद्रपूर येथील सैनिकी शाळेला मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला फेब्रुवारी अखेर संरक्षण खात्याची परवानगी मिळणे अपेक्षित असल्याचे पालकमंत्री म्हणाले. या संदर्भात १२ जानेवारी रोजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सोबत मुंबईला चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.