वेकोलित कामगारांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:49 PM2017-12-01T23:49:55+5:302017-12-01T23:51:29+5:30
उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यासाठी कामगारांचा जीव धोक्यात घालून वेकोलि प्रशासनाने माजरी क्षेत्रातील विविध खाणींत उत्खननाचे काम करीत आहेत.
विनायक येसेकर ।
आॅनलाईन लोकमत
भद्रावती : उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यासाठी कामगारांचा जीव धोक्यात घालून वेकोलि प्रशासनाने माजरी क्षेत्रातील विविध खाणींत उत्खननाचे काम करीत आहेत. याच उत्पादन हव्यासापोठी तेलवासा खाणीत ढिगारा कोसळल्याने कामगाराचा मृत्यू झाला. तर अवघ्या सहा दिवसांत नवीन कुनाडा येथील खाणीतील दरड कोसळून सहा कामगार जखमी झाल्याने विविध कामगार संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
माजरी वेकोलि क्षेत्रातील तेलवासा, चारगाव, ढोरवासा आणि कुनाडा या कोळसा खाणी उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जातात. परंतु, येथील कोळश्याचे उत्पादन काही प्रमाणात ठप्प झाल्याने कामगारांना कामासाठी अन्य खाणीत हलविण्यात आले आहे. तेलवासा व ढोरवासा येथील खाण मोजक्याच कामगारांचा भरोशावर सुरू आहेत. तर चारगाव व कुन्हाडा येथे शंखमुगन कोल कॅरिअर कंपणी व धनसार इंजिनिअरींग या दोन खासगी कंपन्यांकडून माती व कोळसा काढण्याचे काम सुरु आहे. या कंपन्यांवरच वेकोलि प्रशासनाची मदार आहे. वेकोलिच्या तेलवासा येथील खुल्या कोळसा खाणीत २०१७ या एका वर्षात पाच लाख टन कोळसा काढण्याचे उद्दिष्ठ होते. मात्र, प्रत्यक्षात १ लाख टन कोळसा उत्पादन काढण्यात आले. वेकोलिने उत्पादनाच्या हव्यासापोटी या दोन महिन्यात कामगारांना जणू जनावरांप्रमाणे जुंपले होते. कोळसा उत्पादन सुरू असताना तेलवासा क्षेत्राच्या क्षेत्र व्यवस्थापकांना या खाणीतील ब्लॉस्टिंगमुळे बेंचला तडा गेल्याची माहिती होती. तरी सुद्धा वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्याने २४ नोव्हेंबरला ढिगारा कोसळून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. उत्पादन वाढविण्यासाठी हाच पायंडा धनसार इंजिनिअरिंग कंपनीने सुरू ठेवला असून, त्याचे दुष्परिणाम कामगारांच्या अपघातात होत असल्याचे दिसून येत आहे. कुनाडा येथील खुल्या कोळसा खाणीत कंपनीचे ४७५ कामगार कार्यरत आहेत. या खाणीचे दोन वर्षांपासून माती व कोळसा उत्खनन सुरू असून या वर्षी १२ लाख टन कोळसा उत्खनन करण्याचे लक्ष्य देण्यात आले. मात्र, मुदत संपत असल्याचे पाहून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस उत्खनन चालू ठेवले. परिणामी, आतापर्यंत आठ लाख टन कोळसा बाहेर काढण्यात आल्याचे समजते.
वर्षाअखेर चार लाख टन कोळसा काढण्याच्या नादात ३० नोव्हेंबरला ढिगारा कोसळून सहा कामगार जखमी झाले होते. मात्र ही घटना घडण्यापूर्वी वेकोलि प्रशासन तसेच धनसार कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोळसा बेंचमधील मोठ्या भागाला तडा गेल्याचे तेथीलच एका अधिकाऱ्याने कल्पना दिली होती. पण, उत्पादनाचे लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी कामगार तसेच खाणीत सुरक्षेची साधने न वापरता कंपनीने उत्खनन चालू ठेवल्याने हा अनर्थ घडल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या परिसरातील शंखमुगन कोल कॅरिअर व धनसार इंजिनिअरिंग या दोन्ही कंपन्या माती तसेच कोळशाचे उत्खनन करतात. रात्रंदिवस काम करत आहेत. आठ तासांचा कामाचा कालावधी असताना त्यांच्याकडून बारा ते चौदा तास कामे करुन घेतली जात आहेत, तक्रारींची दखल घेण्यात आली नाही.
कामगार कायदा धाब्यावर
कोळसा उत्खनन करणाऱ्या खासगी कंपनीमध्ये स्थानिक कामगारांची संख्या अधिक आहे. मात्र, वेकोलिच्या नियमानुसार कामगारांना कोणत्या सुविधा दिल्या जात नाही. १० हजार ते १२ हजार रुपये मासिक वेतनावर हे कामगार काम करीत आहेत. याविरुद्ध अन्यायग्रस्त खासगी कामगारांनी वेकोलिचे क्षेत्रीय कार्मिक प्रबंधक आणि केंद्रीय श्रम आयुक्तांकडे तक्रार केली होती. परंतु या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. कामगार कायद्याचेही उल्लंघन होत आहे.