३५० सापांना जीवदान
By Admin | Published: July 10, 2016 12:44 AM2016-07-10T00:44:17+5:302016-07-10T00:44:17+5:30
येथील ‘झेप’ या निसर्ग संस्थेने गेल्या वर्षभरात जवळपास ३५० सापांना जीवदान दिले आहे.
एक वर्ष : झेप निसर्ग संस्थेची
नागभीड : येथील ‘झेप’ या निसर्ग संस्थेने गेल्या वर्षभरात जवळपास ३५० सापांना जीवदान दिले आहे. यात विषारी आणि बिनविषारी या दोन्ही प्रकारच्या सापांचा समावेश आहे.
मागील वर्षी जून महिन्यात काही समविचारी युवकांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली. निसर्गाशी संबधित विविध बाबीवर काम सुरू केले. त्यांनी संस्थेची स्थापना केल्यानंतर तालुक्यातील व तालुक्याच्या बाहेरही शाळेत जाऊन सापांविषयी जनजागृती केली. या जनजागृतीने या संस्थेच्या सदस्यांचे नाव परिसरात झाल्याने नागभीड आणि पंचक्रोशीत जिथे कोठे साप दिसते, तेथून या सदस्यांना भ्रमणध्वनीवरून निरोप देण्यात येत होते. निरोप मिळाल्यानंतर संस्थेचे सदस्य त्वरित तिथे धावून जातात. त्या सापाला कोणतीही इजा न पोचविता ताब्यात घेऊन जंगलात सुरक्षित स्थळी सोडून देतात. गेल्या वर्षभराचा विचार केला तर या काळात या संस्थेने जवळपास ३५० सापांना जीवदान दिले असल्याची माहिती झेपचे उपाध्यक्ष अमोल वानखेडे यांनी दिली. यात नाग, मन्यार, घोणस हे विषारी तर धामण, पानदिवट, तस्कर, कवळ्या, माती खाया, रूखई या बिनविषारी सापांचा यात समावेश आहे. याशिवाय घोरपड, घुयेरा यांना जीवदान देण्यात आले आहे. याशिवाय या संस्थेने जंगलात पाणवठे तयार करून उन्हाळ्याच्या दिवसात जंगली प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती, हे विशेष. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष पवन नागरे, उपाध्यक्ष अमोल वानखेडे, सचिव अमित देशमुख, सहसचिव समिर भोयर, कोषाध्यक्ष पंकज गरफडे, नरेंद्र लोहबरे, विश्वेश्वर गिरीपुंजे, टिकाराम नक्षिणे, वीरू गजभिये आदी संस्थेचे पदाधिकारी नेहमीच तत्पर असतात. (तालुका प्रतिनिधी)
साप पकडणे हे जिकरीचे काम आहे. यासाठी शासनाकडून काहीही मिळत नाही. सर्प मित्रांचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. परिणामी त्यांचे कुटुंब उघड्यावर आले. शासनाने सर्पमित्रांना कमीत कमी विमा संरक्षण तरी द्यावे.
- अमोल वानखेडे, उपाध्यक्ष, ‘झेप’