सूर्यांश ही साहित्याची लोकचळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:33 AM2021-02-17T04:33:41+5:302021-02-17T04:33:41+5:30
राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा व कविसंमेलन चंद्रपूर : सूर्यांश ही संस्था आता केवळ चंद्रपूर जिल्ह्यापुरती मर्यादित राहिली नाही ...
राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा व कविसंमेलन
चंद्रपूर : सूर्यांश ही संस्था आता केवळ चंद्रपूर जिल्ह्यापुरती मर्यादित राहिली नाही तर या संस्थेने विदर्भातील अनेक लिहित्या हातांना एकत्र आणून चळवळीचे काम केले आहे. सूर्यांशचे पुरस्कार लोकमान्य झाले आहेत. या पुरस्कारांना एक वलय राज्यातल्या साहित्यक्षेत्रात मिळाले. खऱ्या अर्थाने सूर्यांश ही साहित्याची लोकचळवळ झाली आहे, असे मत गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी व्यक्त केले.
सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूरच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळा व कविसंमेलनात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक वासलवार उपस्थित होते.
सूर्यांश संस्थेचे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पुरस्कारामागील भूमिका संस्थेचे अध्यक्ष कवी इरफान शेख यांनी विशद केली. यावेळी गडचिरोलीच्या कवयित्री मालती सेमले यांच्या बालकवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
संचालन अर्जुमन शेख केले, आभार गीता रायपुरे यांनी मानले. दुसऱ्या सत्रात कवी गजानन माद्यस्वार यांच्या अध्यक्षतेत ज्येष्ठ कवी ना. गो. थुटे, माजी नगरसेवक संजय वैद्य, नीता कोंतमवार, विवेक पत्तीवार, प्रदीप हेमके यांच्या प्रमुख उपस्थितीत 'कविता प्रेमाच्या तुमच्या आमच्या मनातल्या' या शीर्षकांतर्गत बहारदार कविसंमेलन पार पडले. जिल्ह्यातील ७७ कवींनी यात सहभाग घेतला. संचालन कवी सुनील बावणे व कवयित्री सुमेधा श्रीरामे यांनी केले.