संगणक अर्हता प्रकरणी वेतनवाढ वसुलीला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:39 PM2018-02-11T23:39:55+5:302018-02-11T23:41:38+5:30
संगणक हाताळणी प्रमाणपत्रासाठी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देणे व होत असलेल्या वेतनवाढ वसुलीला तत्काळ स्थगिती देण्याची घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात केली.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : संगणक हाताळणी प्रमाणपत्रासाठी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देणे व होत असलेल्या वेतनवाढ वसुलीला तत्काळ स्थगिती देण्याची घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात केली. दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन १० व ११ फेब्रुवारीला मुंबई येथील श्री स्वामी विवेकानंद एज्युकेशन सेंटर दहिसर येथे पार पडले.
संगणक हाताळणी प्रमाणपत्र प्राप्त न केल्यामुळे जिल्ह्यातील व राज्यातील काही जिल्ह्यात सेवेतून निवृत्त होणाºया प्राथमिक शिक्षकांच्या, त्याचप्रमाणे दिवंगत प्राथमिक शिक्षकांच्या ग्रॅच्युइटीतून दिलेल्या वेतनवाढी वसूल करण्याचा सपाटा वित्त विभागाने लावला आहे. या चुकीच्या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने (प्राथमिक) वेळोवेळी शालेय शिक्षणमंत्र्यांकडे निवेदने पाठवून चर्चा केली. त्यामुळे त्यांनी अधिवेशनात घोषणा केल्याचे सहसरचिटणीस प्रकाश चुनारकर यांनी म्हटले आहे.
संगणक अर्हता वसुली संबंधात राज्यपालांकडे निवेदन पाठवून लक्ष वेधले होते. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत राज्यभरातील सर्व शिक्षकांनी मेहनत घेवून शाळा डिजिटल केल्या आहेत. या सर्व शाळांचे वीज देयक सद्या व्यावसायिक दराने आकारणी होत आहे. पुढील आर्थिक वर्षापासून संपूर्ण शाळांची वीज देयके राज्य थेट विद्युत वितरण कंपनीला भरण्याची पद्धतीची योजना तयार करण्यात येत असल्याचे विनोद तावडे यांनी अधिवेशनात सांगितले. प्रलंबित मागण्यासंबंधात १४ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे बैठक आयोजित केली असून विविध मागण्यांवर चर्चा होणार असल्याचे चुनारकर यांनी म्हटले आहे.