सिंधी येथील शेतकऱ्याचा रेल्वे रुळावर संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:30 AM2021-05-20T04:30:30+5:302021-05-20T04:30:30+5:30
राजुरा : राजुरा तालुक्यातील सिंधी या गावातील शेतकरी तिरूपती तातोबा धानोरकर (४३) यांचा मृतदेह बुधवारी सकाळी रेल्वे लाईनवर आढळून ...
राजुरा : राजुरा तालुक्यातील सिंधी या गावातील शेतकरी तिरूपती तातोबा धानोरकर (४३) यांचा मृतदेह बुधवारी सकाळी रेल्वे लाईनवर आढळून आला. वरकरणी रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसत असले तरी त्यांची हत्याच झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. याची माहिती मिळताच विरूर स्टेशन पोलिसांनी घटनास्थळ गाठले. रेल्वे विभागाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला असला तरी हत्येच्या दिशेने त्यांचा तपास सुरू आहे.
तिरुपती धानोरकर यांचा शेती विकण्याचा सौदा झाला. त्यांना काही रक्कमसुद्धा प्राप्त झाल्याची माहिती आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी रेल्वे लाईनवर तिरुपती धानोरकर यांचा मृतदेहच आढळून आला. त्यांचे दोन तुकडे झाले होते. परंतु ही आत्महत्या नसून हत्या झाली असल्याची चर्चा परिसरात आहे. विरूर स्टेशनचे ठाणेदार कृष्णा तिवारी यांनी घटनास्थळी भेट दिली. रेल्वे विभागाच्या तक्रारीवरून मर्ग दाखल केला असून तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
बॉक्स
मुलानेच हत्या केल्याचा संशय
राजुराचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक घटनास्थळी तपास करीत आहेत. मुलानेच वडिलांची हत्या करून रेल्वे रुळावर फेकल्याचा संशय गावातील नागरिकांनी व्यक्त केला. दरम्यान, मुलानेही हत्येची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रानी सांगितले. मुलाने पहिले वडिलांचा रेल्वेगाडीखाली आल्याने मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. पोलिसांनी संशयावरून मुलाला बोलते केल्याने त्याने कबुली दिल्याचीही माहिती सूत्रानी दिली. मात्र, अद्याप या संदर्भात गुन्हा दाखल झाला नसल्याचीही माहिती आहे.