गोड बोलण्यातून वाढेल एकमेकांप्रती आत्मियता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 11:04 PM2019-01-22T23:04:29+5:302019-01-22T23:04:53+5:30
संत तुकारामांनी ‘आम्हा घरी शब्दांची रत्ने’ हा अभंग लिहून शब्दांचे सामर्थ्य दाखवून दिले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भाषेचा कसा वापर होतो, यावर सुसंवादाची प्रक्रिया पुढे जाते. मुल जन्माला आल्यानंतर बोबड्या बोलापासून तर भाषिकस्तर उंचावण्यासाठी कुटुंब व सभोवतीचे सामाजिक पर्यावरण कसे असते, हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
संत तुकारामांनी ‘आम्हा घरी शब्दांची रत्ने’ हा अभंग लिहून शब्दांचे सामर्थ्य दाखवून दिले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भाषेचा कसा वापर होतो, यावर सुसंवादाची प्रक्रिया पुढे जाते. मुल जन्माला आल्यानंतर बोबड्या बोलापासून तर भाषिकस्तर उंचावण्यासाठी कुटुंब व सभोवतीचे सामाजिक पर्यावरण कसे असते, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. गोड अन् लाघवी बोलण्यातून माणसे जुळतात. नकारात्मक बोलण्याने दुरावतात, असे मत चंद्रपूर मनपाचे प्रशासन अधिकारी (शिक्षण) नागेश नित यांनी व्यक्त केले.
गोड बोलण्यामुळे खरे यातून एकमेकांविषयी आदराची भावना निर्माण होते. तरीदेखील काही व्यक्ती याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने सतत विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहतो. कुटुंबापेक्षा विद्यार्थ्यांचा सर्वाधिक वेळ शाळेतच जात जातो. अध्यापन व अध्ययनाची प्रक्रिया ही दुहेरी असते. यामध्ये संवाद हा घटक महत्त्वाचा ठरतो. विषय समजावून सांगताना शिक्षक रंजकतेचा वापर करत असतील तर ज्ञान विद्यार्थ्यांच्या मनात ठसते. ज्ञानग्रहनातील संकटे दूर होतात. मराठी संत साहित्यात अशी हजारो उदाहरणे आहेत. जगणे कितीही कष्टप्रद असो गोड बोलण्याने एका क्षणात दु:ख हलके होते.
दैनंदिन आयुष्यात अनेकदा मतभेद निर्माण होतात. मात्र मनभेदांना थारा देऊ नये. बोलण्यातील माधुर्य टिकविण्याची प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. दोन पिढ्यांचा भाषिकस्तर आता बदलला असला तरी त्यातील गोडवा कदापि संपणार नाही, अशी शब्दसंपत्ती मराठी भाषेत आहे.