क्षुल्लक भांडणात निघाल्या तलवारी

By admin | Published: September 20, 2015 01:23 AM2015-09-20T01:23:17+5:302015-09-20T01:23:17+5:30

स्थानिक घुटकाळा तलाव परिसरात दुकानासमोर वाहन लावण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली.

Sword | क्षुल्लक भांडणात निघाल्या तलवारी

क्षुल्लक भांडणात निघाल्या तलवारी

Next

वाहन पेटविले : सहा जखमी, पाच जणांना अटक, घुटकाळा तलाव परिसरात तणाव
चंद्रपूर : स्थानिक घुटकाळा तलाव परिसरात दुकानासमोर वाहन लावण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या दरम्यान, सत्तूर, तलवारी चालल्या. त्यात दोनही गटातील लोक गंभीर जखमी झालेत. दुकानासमोर उभे करण्यात आलेले वाहनही पेटवून देण्यात आले. या घटनेमुळे या परिसरात रात्री उशिरापर्यंत तणाव होता. अग्नीशमन दलाच्या मदतीने पेटविलेले वाहन विझविण्यात आले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर दंगा नियंत्रण पथकाससह रामनगर व शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी पोहचला. त्यानंतर हाणामारीतील जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या प्रकरणी दोनही गटांतील १८ जणांविरुद्ध भादंवि १४७, १४८, १४९, ३०७,४५२, ४३५, ४२७, आर्मअ‍ॅक्टअन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांपैकी पाचजणांना शहर पोलिसांनी अटक केली.
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक घुटकाळा तलाव परिसरातील दुकानासमोर वाहन उभे केल्याच्या कारणावरून सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास वादाची ठिणगी पडली. दुकानासमोर वाहन ठेवण्याबाबत मो.राजीक यांनी हटकले असता, नुरू, भुऱ्या, वसीम, जमिल कुरेशी, शकील कुरेशी व अन्य तिघांनी संगनमत करून मो.अब्दूल राजिक यांचा भाऊ बिलाल मो.ईब्राहिम, दुकानातील दिवाणजी, नोकर मो.हाफीज, अल्लाउद्दीन खान यांच्यावर तलवार, सत्तूर व लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी मो.अब्दूल राजीक यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली. दुसऱ्या गटाकडून फातीमा अब्दूल वहाब यांनी शहर पोलिसांकडे तक्रार केली. फातीमा यांच्या तक्रारीनुसार, हबीब मेमन, वकील खान, मो.बिलाल, मो.ईब्राहिम, शकील, अब्दूल राजीक व अन्य चार जणांनी नुरू, वसिम कुरेशी यांच्यावर लाठ्या, काठ्या, व रॉडने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी हबीब मेमन यांच्यासह त्यांच्या अन्य साथिदारांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सायंकाळी ७.३० वाजतापासून सुरू झालेला हा राडा रात्री ११ वाजता शमला. या घटनेमुळे परिसरात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते. कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता, या परिसरात रात्रभर दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
पोलिसांची धावाधाव
एकीकडे शहरात जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात असताना, दुसरीकडे घुटकाळा परिसरात क्षुल्लक कारणावरून तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यातून वाहन पेटवून देण्यात आले. दोन गटातील सदस्यांनी एकमेकावर तलवारी, सत्तूर चालविले. घटना अतिशय गंभीर असल्याने चंद्रपूर शहर पोलीस, रामनगर पोलीस घटनास्थळी पोहचले. दंगानियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले. वादावादी करणाऱ्यांना आवरताना पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून या परिसरात मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता.

Web Title: Sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.