४३२ शिक्षकांवर बदलीची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 05:00 AM2020-08-04T05:00:00+5:302020-08-04T05:00:09+5:30
बदलीपात्र ४३२ शिक्षकांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑफलाईन बदल्या होणार असल्याने गोंधळ लक्षात घेता सीईओ राहूल कर्डिले यांनी विविध १६ संघटनांचे मत जाणून घेण्यासाठी मंगळवारी बैठक बोलाविली आहे. दरम्यान, काही शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बदली प्रक्रिया बघता जिल्हा परिषदेमध्ये चकराही वाढविल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बदल्यांसदर्भात संभ्रम असतानाच शासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यातील शिक्षकांच्या आॅफलाईन पद्धतीने बदल्या केल्या जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तयारी सुरु केली आहे. बदलीपात्र ४३२ शिक्षकांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑफलाईन बदल्या होणार असल्याने गोंधळ लक्षात घेता सीईओ राहूल कर्डिले यांनी विविध १६ संघटनांचे मत जाणून घेण्यासाठी मंगळवारी बैठक बोलाविली आहे. दरम्यान, काही शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बदली प्रक्रिया बघता जिल्हा परिषदेमध्ये चकराही वाढविल्या आहेत.
कोरोनामुळे यावर्षी बदली होणार नाही, अशी शिक्षकांना आशा होती. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये काही शिक्षकांनी आपले कर्तव्य पार पाडले. मात्र, आता बदली करण्याचा शासनाने निर्णय घेतल्यामुळे बदलीपात्र शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिथे आहे त्याच ठिकाणी ठेवावे, अशीही शिक्षकांनी अपेक्षा आहे. संवर्ग एक आणि दोनमध्ये समावेश असलेल्या शिक्षकांना सेवाकालावधीची अट न ठेवता त्यांची विनंती बदली करण्यात यावी, अशी मागणीही शिक्षकांची आहे.
विशेष म्हणजे, संवर्ग एकमध्ये असलेल्या शिक्षकांना बदलीतून सुट किंवा बदली करण्यासाठी आवश्यक कागदपत्र जोडावे लागणार आहे. दरम्यान, कोरोनामुळे त्यांना हे कागदपत्र जुळविताना मोठी कसरत करावी लागणार आहे. यामध्ये दिव्यांग, घटस्पोट, परित्यक्ता, विविध आजार, ५३ वर्ष वयाच्या वर तसेच, आजी, माजी सैनिक आदींचा समावेश आहे. या सर्वांना बदलीप्रक्रियेमध्ये आवश्यक कागदपत्र सादर करावे लागणार आहे. दिव्यांग शिक्षकांना रुग्णालयातून डॉक्टरांचे प्रमाणपत्रही जोडावे लागणार असल्याने त्यांनाही मोठ्या अडचणीचा सामोरे जावे लागणार आहे.
‘त्या’ ६३ गावातील महिला शिक्षकांचे काय?
जिल्ह्यात अतीअवघड क्षेत्र म्हणून ६३ गावांची यादी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. शासन नियमानुसार अतिअवघड क्षेत्रामध्ये महिला शिक्षक कार्यरत असेल तर त्यांच्या विनंतीनुसार त्या बदलीस पात्र ठरतात. मात्र जिल्ह्यात अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला शिक्षकांना अद्यापही संधी न दिल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे किमान या बदलीमध्ये तरी त्यांचा विचार करावा, असा सूरही महिला शिक्षकांमध्ये आहे.
बदली टाळण्यासाठी शिक्षकांचा खटाटोप
शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमध्ये शासनाने ठरवून दिलेले नियम आणि अटींची पूर्णता करणे गरजेचे आहे. मात्र जिल्ह्यातील काही पंचायत समितीमधील शिक्षकांनी बदलीत सुट मिळविण्यासाठी वेगळाच खटाटोप चालविला आहे. सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असतानाच त्याच शाळेत विषय शिक्षक म्हणून पदोन्नत्ती झालेले काही शिक्षक बदलीस पात्र आहे. मात्र पदोन्नती दाखवून त्यांनी बदलीतून सुट मिळवून घेतली. यामुळे जिल्ह्यातील अन्य शिक्षकांमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, काहींनी यासंदर्भात सीईओंची भेट घेवून या प्रकाराकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या शिक्षकांच्याही बदल्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रशासकीय बदलींसाठी पात्र शिक्षक
सर्वसाधारण क्षेत्रातील शिक्षकांसाठी सलग १० वर्ष सेवा पूर्ण झालेली असावी,विद्यमान शाळेत ३१ मे २०२० पर्यंत किमान ३ वर्ष सेवा दिली असावी. अवघड क्षेत्रासाठी बदली अधिकारपात्र शिक्षकांसाठी किमान तीन वर्ष सेवा तसेच विद्यमान शाळेत सलग तीन वर्ष पूर्ण आवश्यक आहे.
ब्रह्मपुरीतील शिक्षकांमध्ये नाराजी
जिल्ह्यातील ३६२ शाळा अवघड क्षेत्रात आहे. यातील काही शाळा शासनाच्या निर्देशानुसार अवघड क्षेत्रात असल्या तरी काही शाळांमध्ये सुविधा आहे. मात्र ब्रह्मपुरी तालुक्यातील १३ शाळा अवघड क्षेत्रात असताना आणि यासंदर्भात संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी वेळोवेळी शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करूनही त्या शाळा अवघड क्षेत्रात सामावून घेण्यात आल्या नाही. त्यामुळे ब्रह्मपुरी पंचायत समितीमधील शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.