चिन्ह मिळाले अन् उमेदवार हिरमुसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:32 AM2021-01-08T05:32:34+5:302021-01-08T05:32:34+5:30
गोंडपिपरी : मोठ्या आवडीने उमेदवारांनी पाच निवडणूक चिन्ह निवडले होते. यातील एखादे चिन्ह आपणास मिळणार या आशेत उमेदवार होते. ...
गोंडपिपरी : मोठ्या आवडीने उमेदवारांनी पाच निवडणूक चिन्ह निवडले होते. यातील एखादे चिन्ह आपणास मिळणार या आशेत उमेदवार होते. मात्र घडले भलतेच. एकाही उमेदवाराला पसंतीचे चिन्ह मिळाले नाही. चिन्ह मिळाल्याचा आनंद असला तरी आवडीचे चिन्ह न मिळाल्याने अनेकजण हिरमुसले आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. ३३७ जागांसाठी ८४८ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. ४ जानेवारी रोजी नामांकन अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. यावेळी ३८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. उर्वरित ८१० उमेदवार निवडणुकीचा रिंगणात आहेत. रिंगणात असलेल्या उमेदवारांनी आपल्या आवडीच्या पाच चिन्हांची मागणी केली होती. आपण निवडलेल्या चिन्हापैकी एखादे चिन्ह मिळणार अशी अपेक्षा उमेदवारांना होती. मात्र घडले विपरीत. चिन्ह निवडीत उमेदवारांच्या पसंतीकडे दुर्लक्ष करून निवडणूक अधिकाऱ्यांनी क्रमागत चिन्हांचे वाटप केले. अनेक उमेदवारांना मनाविरोधी चिन्ह मिळाल्याने नाराजी दिसून येत आहे. उमेदवारांनी नामांकन अर्ज सादर करीत असताना पाच चिन्हांचा पसंतीक्रम नमूद केला होता. मात्र या नमूद चिन्हांची कुठल्याही प्रकारे दखल न घेता क्रमानुसार चिन्ह वाटप केल्याने उमेदवारात नाराजी दिसून येत आहे.