५४ व्यक्तींना मुख कर्करोगाची लक्षणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:43 PM2018-02-10T23:43:35+5:302018-02-10T23:44:02+5:30
राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिनानिमित्त राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मुख आरोग्य तपासणी दरम्यान तालुक्यातील १ हजार २८६ रुग्णांची तपासणी करण्यात आली़ त्यामध्ये ५४ जणांना मुखपूर्व कर्करोगाची लक्षणे आढल्याचे उघडकीस आले आहे़
आॅनलाईन लोकमत
सावली: राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिनानिमित्त राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मुख आरोग्य तपासणी दरम्यान तालुक्यातील १ हजार २८६ रुग्णांची तपासणी करण्यात आली़ त्यामध्ये ५४ जणांना मुखपूर्व कर्करोगाची लक्षणे आढल्याचे उघडकीस आले आहे़
राज्यात तीन वर्षांपासून तंबाखुजन्य वस्तूवर पूर्णत: बंदी आहे़ मात्र, बंदी असूनही दुकानातून सर्रास विकली जात आहे. त्यामुळे खर्रा, तंबाखू, गुटखा सहज उपलब्ध होते़ विशेषकरुन विद्यार्थी व महिला या विषारी पदार्थाच्या व्यसनात अडकले आहेत़ विद्यार्थी तसेच युवकांमध्ये तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण लक्षात घेवून शासनाकडून शैक्षणिक संस्थेत तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी सुरू केली़ १०० यार्डच्या आतमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी घातली आहे. तसेच नागरिक या व्यसनांपासून दूर राहावे याकरिता तंबाखूचे दुष्परिणाम दाखविण्यासाठी जागृती केली जात आहे़ मात्र सकारात्मक परिणाम होताना दिसत नाही. उलट यामध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अल्पशा आनंदामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम सोसावे लागत असल्याची गंभीर बाब मुखपूर्व कर्करोग असलेल्या उपलब्ध आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डिसेंबर महिन्याच्या पंधरवड्यात ३० वर्षांवरील रुग्णांची मुख तपासणी करण्यात आली. यामध्ये विविध शासकीय, निमशासकीय कर्मचाºयांशिवाय सर्वसामान्य जनतेची तपासणी करण्यात आली होती़ ५८६ पुरुष आणि ६९० महिला अशा एकून १ हजार २८६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये ५० टक्के लोकांना तंबाखू सेवनाचे व्यसन असल्याचे आढळून आले. यात तोंड न उघडता येणाºया रुग्णांची संख्या ५६ च्या घरात आहे़ पांढरा चट्टा ९ रुग्णांना, जाड त्वचा १७ रुग्णांना आणि १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस होऊनही सहा रुग्णांचा व्रण बरा झाला नव्हता. यापैकी ५४ जणांना मुखपूर्व कर्करोगाची लक्षणे दिसून आले. दरम्यान, जि.प. शाळा तसेच खासगी संस्थामध्ये तंबाखूचे होणारे दृष्परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात आले़ तंबाखू सेवन न करण्याची प्रतिज्ञाही देण्यात आली. तालुक्यात या रोगाची व्याप्ती अतिशय वेगाने वाढत असून पूर्वी मुखशुद्धी व पाचकद्रव्य म्हणून पानाचा वापर केला जात होता़ मात्र विड्याच्या पानाची जागा गुटख्याने घेतली आहे.