सायफन तंत्राने ७०० एकर शेतीचे सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:07 AM2017-09-22T00:07:43+5:302017-09-22T00:08:08+5:30

तालुक्यात सरासरीपेक्षा ५० टक्के पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक गावातील तलाव कोरडे पडले आहेत.

Syphan technique irrigates 700 acres of land | सायफन तंत्राने ७०० एकर शेतीचे सिंचन

सायफन तंत्राने ७०० एकर शेतीचे सिंचन

googlenewsNext
ठळक मुद्देपालेबारा येथील शेतकºयांचे कष्ट : विजेविना सुरू असते पाण्याचा प्रवाह

उदय गडकरी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : तालुक्यात सरासरीपेक्षा ५० टक्के पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक गावातील तलाव कोरडे पडले आहेत. तर कित्येक ठिकाणातील तलाव अर्धेच भरल्याने धानाचे पीक घेणाºया शेतकºयांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशीच परिस्थिती सावली तालुक्यातील पालेबारसा गावाची आहे.
डोक्यावरुन गोसीखुर्द प्रकल्पाचा कालवा वाहत असताना सुद्धा पालेबारसा येथील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळू शकत नाही. या परिस्थितीचा गावकºयांनी विचार केला. आणि कोणत्याही परिस्थितीत नहराचे पाणी शेतापर्यंत पोहचवायचे यासाठी चंग बांधला. त्यांनी कालवा फोडून पाईप टाकायचे आणि सातशे एकर शेतीचे सिंचन करायचे, हे मनाशी पक्के केले. त्यासाठी गावकºयांनी लोकवर्गणीतून सुमारे एक लाख रुपयाचे पाईपही खरेदी केले व कालवा फोडण्याच्या तयारीला लागले. ही बाब गोसीखुर्द प्रकल्पाच्या अधिकाºयांना कळताच त्यांनी पालेबारसा येथील शेतकºयांना मज्जाव केला. मात्र ही बाब गावकºयांच्या पचनी पडली नाही. त्यात ते हतबल झाले. शेवटी काय करायचे, या विवंचनेत असतानाच गोसीखुर्दचे कार्यकारी अभियंता हटवार यांनी गावकºयांना सायफन तंत्राची कल्पना सुचविली. या बाबीला गावकरी तयार झाले. परंतु पाण्याचा उपसा करण्याची परवानगी मिळविण्यासाठी अडचण येत होती.
शेवटी आमदार विजय वडेट्टीवार यांनी सहकार्य करुन सायफन तंत्राने पाण्याचा उपसा करण्याची परवानगी मिळवून दिली. त्यामुळे पालेबारसा परिसरातील सुमारे सातशे एकर शेती सिंचनाखाली येणार असल्याने सर्व गावकरी आनंदीत झाले आहेत.
गेल्या दहा-बारा दिवसांपासून शंभर फुटाच्या १५ पाईपमधून रात्रंदिवस पाणी सुरु असून त्या पाण्याने गावातील तीन तलाव भरुन संपूर्ण शेती सिंचनाखाली आणण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. इंधन आणि विना यंत्राने, कोणताही विद्युत प्रवाह न वापरता दिवस-रात्र सतत पाणी सुरु आहे. त्यासाठी गावकरी मात्र आळीपाळीने परिश्रम करताना दिसतात. प्रस्तुत प्रतिनिधीने सायफन तंत्राची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष भेट दिली असता, नहराच्या काठावर पेट्रोमॅक्सवर चालणारे छोटे यंत्र ठेवण्यात आले आहे. सुरुवातीला ते इंजीन सुरु करून पाईपमधून पाणी सोडण्यात येते. एकदा पाणी सुरु झाले की, इंजीन मधून पाणी जाणारा पाईप काढून टाकला जातो. अशाप्रकारे पंधरा पाईपमधून पाणी टाकण्याचे काम अविरत सुरू आहे. या पाईपांमधून निघणारे पाणी तीन किमी अंतरावर असलेल्या तलावांमध्ये सोडले जात आहे, हे विशेष!
तसे हे तंत्रज्ञान जुनेच असले तरी (तोंडावारे छोट्या पाईपातून कोणताही द्रव पदार्थ ओढण्याची पद्धत) बहुतेक एवढ्या मोठ्या प्रमाणात सायफन तंत्राद्वारे पाण्याचा उपसा करण्याची शक्यतो पहिलीच घटना असावी. गावकºयांच्या एकजुटीने व लोकसहभागातून कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाने सातशे एकर शेती सिंचनाखाली येणार असल्याने गावकºयांत आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे यावर्षी तरी चांगले उत्पादन होईल, अशी शेतकºयांना आशा आहे.
 

Web Title: Syphan technique irrigates 700 acres of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.