शेतकऱ्यांसाठी यंत्रणेने पुढे यावे

By admin | Published: May 7, 2017 12:28 AM2017-05-07T00:28:55+5:302017-05-07T00:39:08+5:30

शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्यात येते.

The system should come forward for farmers | शेतकऱ्यांसाठी यंत्रणेने पुढे यावे

शेतकऱ्यांसाठी यंत्रणेने पुढे यावे

Next

अधिकाऱ्यांना दिले निर्देश : पालकमंत्र्यांकडून खरीप नियोजनाचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्यात येते. ही रक्कम शेतकऱ्यांकडे असणाऱ्या कर्जाजी रक्कम म्हणून परस्पर कपात करण्यात येवू नये, कपात केली असल्यास तातडीने त्याच्या खात्यात पुन्हा जमा करावी. तसेच शेतकऱ्यांना आवश्यक वेळी मदतीसाठी सर्व यंत्रणेने तयार रहावे, या मोसमात शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहन वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
२०१७-१८ खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा त्यांनी आज शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात घेतला. या बैठकीत शेतकऱ्यांचे बचत खात्याशी कर्ज खाते जोडले असल्यामुळे विविध योजनांसाठी लाभार्थी म्हणून मिळालेली रक्कम परस्पर कपात केली जात असल्याच्या तक्रारी अनेक अधिकाऱ्यांनी नमूद केल्या. त्यामुळे यापुढे बँकेने शेतकऱ्यांना मनस्ताप होईल, अशा पध्दतीची कपात करु नये. तसेच विविध योजनांच्या संदर्भात पत पुरवठा करताना, कर्जाचे पुनर्गठण करताना बँकेमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तम सहकार्याची अपेक्षा राहील, असा सूचक संदेश त्यांनी बँकांना दिला.
शासनाच्या उन्नत शेती, समृध्द शेतकरी या धोरणाचा पुरस्कार करत आगामी खरीपाचे नियोजन करण्यात यावे, शासनाच्या सर्व यंत्रणांनी परस्पराशी समन्वय ठेवत शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी पाणी, विजेची व वीज पंपांची उपलब्धता, मागेल त्याला विहीर, आधुनिक शेती तंत्रज्ञान पुरविण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय जिल्हयातील खरीप हंगामासाठी बियाणाची उपलब्धता, खते, हवामानाचा अंदाज, जिल्हयातील कृषी केंद्राची तपासणी, गुणनियंत्रण, भरारी पथकांचे गठन, गोदामांची उपलब्धता, विज पंपाची सद्यस्थिती, सिंचन आदी बाबींचा घटकवार आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रलंबित विद्युत मीटर, खते व बियाण्यांची उपलब्धता व बँकेचे कर्ज आदी विषयावर उपस्थित सदस्यांनी चर्चा केली.

आरोग्य तपासणी मोहिमेचाही घेतला आढावा
१ मेपासून सुरु झालेल्या मोफत आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेचा आढावाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. यावेळी चंद्रपूर जिल्हयाच्या आरोग्य यंत्रणेला नागपूर अन्य जिल्हयातून डॉक्टर, शिकाऊ डॉक्टर व अन्य यंत्रणेची किती प्रमाणात मदत होईल या संदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीला नागपूर विभागातील विविध आरोग्य यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांना मोफत आरोग्य पुरविण्याची संधी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानातून प्राप्त झाली आहे. त्यामुळे या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या वेगवेगळया घटकांनी परस्पराशी समन्वय ठेवून उपक्रम यशस्वी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे, असे आवाहन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले. या अभियानात गेल्या तीन दिवसात चार हजार ५७२ नागरिकांचा आरोग्य डाटा निर्माण केल्याबद्दल त्यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले.

चार लाख ७६ हजारांवर खरिपाचा पेरा
सन २०१७-१८ मध्ये खरीप हंगामाकरिता चार लाख ७६ हजार ३०१ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात एक लाख ८० हजार ३६८, सोयाबिन ८० हजार ७९३, कापूस एक लाख ६९ हजार ३४९, तुर ४९ हजार ११४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हयाला विविध पिकांकरिता एकूण ७५ हजार ९९९ क्विंटल बियाणाची आवश्यकता आहे. जिल्हयास खरीप हंगामाकरिता एक लाख २२ हजार ६००मे.टन रासायानिक खतांचे आवंटन आहे.

Web Title: The system should come forward for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.