भाऊंच्या आत्मविश्वासाला तार्इंचा अडसर

By admin | Published: June 14, 2014 11:27 PM2014-06-14T23:27:55+5:302014-06-14T23:27:55+5:30

बल्लारपूर हा मतदारसंघ जुना नव्हे तर, २००९ च्या केंद्रीय पुनर्रचनेत निर्माण झालेला आहे. पूर्वी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातच असलेल्या बल्लारपूरचे विभाजन करून हा नवा मतदार संघ अस्तित्वात आला.

Tackling brother's confidence | भाऊंच्या आत्मविश्वासाला तार्इंचा अडसर

भाऊंच्या आत्मविश्वासाला तार्इंचा अडसर

Next

गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूर
बल्लारपूर हा मतदारसंघ जुना नव्हे तर, २००९ च्या केंद्रीय पुनर्रचनेत निर्माण झालेला आहे. पूर्वी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातच असलेल्या बल्लारपूरचे विभाजन करून हा नवा मतदार संघ अस्तित्वात आला. त्यासाठी मूल-सावली मतदारसंघ गोठविण्यात आला. तिकडे भाजपाच्या शोभाताई फडणवीस बेघर झाल्या. चंद्रपूर अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने आपला परंपरागत मतदारसंघ सोडून सुधीर मुनगंटीवारांना बल्लारपुरात यावे लागले. तर, शोभातार्इंना विधान परिषदेत सदस्यत्व देवून पक्षाकडून राजकीय पूनर्वसन करण्यात आले.
या क्षेत्रात होणारी विधानसभेची ही दुसरी निवडणूक आहे. भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची येथून दुसऱ्यांदा (आजवर मिळून पाचव्यांदा) पुन्हा जय्यत तयारी सुरू आहे. गेल्या वेळी काँग्रेसने त्यांच्या विरोधात जोरात ताकद लावली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांचे राजकीय वारसदार या नात्याने राहूल पुगलिया यांना मैदानात उतरविण्यात आले होते. विदर्भात प्रचंड चर्चेच्या ठरलेल्या या लढतील अखेर बाजी मात्र सुधीर मुनगंटीवारांनीच मारली होती. ८२ हजार १९६ मते घेवून त्यांनी राहूल पुगलिया यांचा २० हजार ७३६ मतांनी पराभव केला होता.
राजकीय व्यस्ततेतूनही मतदारांशी असलेला कायम जनसंपर्क ही मुनगंटीवारांंची जमेची सर्वात मोठी बाजू आहे. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीतही मतदारांनी भाजपाच्या पारड्यात अधिक मते टाकली आहेत. काँग्रेसपेक्षा २९ हजारांवर मतांची लिड येथून भाजपाला मिळाली.
भाजपासाठी वातावरण तसे ठिकठाक दिसत असले तरी, शोभाताई फडणवीसांच्या नाराजीचा सामना मुनगंटीवारांना येथे करावाच लागणार आहे. या मतदारसंघात बल्लारपूर आणि मूल या दोन नगरपालिका आहेत. मूल हा शोभातार्इंचा मतदारसंघ होता. एके काळी वामनराव गड्डमवारांसारख्या मातब्बर नेत्याला पराभूत करून आपले पाय राजकारणात घट्ट रोवणाऱ्या तार्इंना विधान परिषद सदस्यत्व घेवून नाईलाजाने सभागृहात मागच्या दाराने जावे लागले. त्याची सल त्यांना आहे. यापूर्वी त्यांचे मुनगंटीवारांशी चांगले जमायचे. आता मात्र दोघांमधून विस्तवही जात नाही. तसे खासदार हंसराज अहीरांशीही तार्इंचे बिनसले आहे. मूल तालुक्यात तार्इंना मानणारा वर्ग मोठा आहे. विधानपरिषदेवर जावूनही त्यांनी जनसंपर्क मात्र तुटू दिला नाही. त्यामुळे भाजपाला त्यांना विश्वासात घेवूनच काम करावे लागणार आहे. राजकीय महत्वाकांज्ञेपोटी त्या बल्लारपुरातून दावेदारीही करू शकतात, अशी चर्चा आहे.
काँग्रेसला येथे बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. गेल्या वेळी राहूल पुगलिया यांनी मुनगंटीवारांसारख्या मातब्बराला दिलेली टक्कर तशी मोठीच होती. काँग्रेसने राबविलेल्या प्रचार यंत्रणेमुळे भाजपालाही घाम फुटला होता. मात्र मतदारांनी अखेरच्या क्षणी मुनगंटीवारांना पसंती दिली. गेल्या पाच वर्षात बल्लारपुरातील स्थिती बदलली आहे. बल्लारपूर पेपर मील हे पुगलिया यांचे बलस्थान आहे. कामगार नेता अशी प्रतिमा असलेल्या नरेश पुगलिया यांची या वर्गाने कायम पाठराखण केली आहे. मात्र अलिकडे बल्लारपूर पेपर मिलमध्ये कामगार वर्गात सुरू असलेल्या संघर्षामुळे वातावरण काही अंशी बदललेले दिसत आहे. काँग्रेसकडून उमेदवार बदलला आणि स्थानिकाला उमेदवारी देण्याचा विचार झाला तर, घनश्याम मुलचंदाणी यांचे नाव पुढे येवू शकते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाशपाटील मारकवार हे सुद्धा या ठिकाणी संधीच्या शोधात आहेत. जिल्हा परिषदेतील अनुभवाच्या बळावर ते सुद्धा आपले नाव मुंबईत चालवित आहेत. यावेळी शिवसेना आणि मनसेही रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेकडून सिक्की यादव यांचे तर मनसेकडून विष्णु बुजोणे यांचे नाव घेतले जात आहे.
पेपरमीलमुळे होणारे वायू आणि जल प्रदुषण, कोळसा खाणीमुळे बदलेले पर्यावरण आणि पोंभूर्णासारख्या मागास क्षेत्राचा विकास हे येथील मुख्य प्रश्न आहेत. पण गेल्या अनेक वर्षात मीलच्या प्रदुषणाचा प्रश्न सुटू शकलेला नाही. मुनगंटीवारांच्या काळातही न्याय न मिळाल्याची मतदारांची भावना आहे. त्यामुळे कुणालाही हे मुद्दे दुर्लक्षित करून चालणार नाही, हे तेवढेच खरे.

Web Title: Tackling brother's confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.