तंटामुक्त समित्या सक्रिय करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:19 PM2017-11-17T23:19:51+5:302017-11-17T23:20:17+5:30
शासनाने सुरू केलेली महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम गावागावांत शांतता निर्माण करण्यास मोलाची कामगिरी बजावत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : शासनाने सुरू केलेली महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम गावागावांत शांतता निर्माण करण्यास मोलाची कामगिरी बजावत आहे. त्यामुळे तालुक्यातील केळझर, सुशी, जुनासूर्ला या गावात केलेल्या दारुबंदीवरुन दिसून येते. त्यामुळे गावातील अवैध धंदे रोखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीला पुन्हा गतिमान करणार, अशी माहिती पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी वार्तालाप कार्यक्रमात दिली.
नियती ठाकेर पुढे म्हणाल्या, उद्ध्वस्त होणारे संसार सावरण्यासाठी शासनाने दारुबंदी केली. चांगला व सकारात्मक निर्णय असल्याने सर्वांनी त्याचे स्वागत केले. मात्र, पोलीस प्रशासनाव्यतिरिक्त प्रशासनातील अन्य घटक व लोकसहभाग न मिळाल्याने गावा-गावात दारु अवैध मार्गाने सुरु असल्याचे दिसून येते. पोलीस प्रशासनाकडे फक्त दारुबंदीच्या कामाबरोबरच इतरही दररोज घडणाºया घटनाकडे लक्ष केंद्रीत करावे लागते. तसेच प्रशासकीय कागदपत्रांची जुडवाजुडव करण्यास पोलीस व्यस्त असतात. त्यामुळे गावातील अवैध धंद्यावर पायबंद घालण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचा सहभाग घेतल्यास केळझर, सुशी, जुनासूर्ला या गावात झालेला सकारात्मक बदल घडवून आणता येईल, याकडेही पोलीस अधीक्षक ठाकेर यांनी लक्ष वेधले.
महात्मा गांधी तंटामुक्त समितीत पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक व प्रशासनातील इतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांचा सहभाग असल्याने गावाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली जाऊ शकतात, असेही त्या म्हणाल्या. ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था योग्य राहिल्यास विकासाला चालना मिळते. त्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातही सामंज्य राहिल्या अनेक विकासकामे जोमाने पूर्ण होऊ शकतात.
हे हेरुन या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये गावागावांतील महात्मा गांधी तंटामुक्त समितीची बैठक बोलावून गावात असलेल्या अवैध धंद्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ, असेही मत पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज सिंग राजपूत व पोलीस अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.