ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : बचत गटांच्या ४०० महिलांसाठी ‘भरारी’

By साईनाथ कुचनकार | Published: June 7, 2024 07:25 PM2024-06-07T19:25:55+5:302024-06-07T19:26:04+5:30

वनातील आनंदाचा एक दिवस हा आनंददायी भरारी उपक्रम आहे.

Tadoba Bharari activity of forest and wildlife conservation for Self Help Womens Group | ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : बचत गटांच्या ४०० महिलांसाठी ‘भरारी’

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : बचत गटांच्या ४०० महिलांसाठी ‘भरारी’

चंद्रपूर : ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात असलेल्या गावातील स्वयंसहाय्यता महिला बचत गटामार्फत वने व वन्यजीव संवर्धन संदर्भातील ‘भरारी" उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वनातील आनंदाचा एक दिवस हा आनंददायी भरारी उपक्रम आहे. यामध्ये मोहर्ली वनपरिक्षेत्रातील १० गावे असून, प्रतिदिवस एक गाव व ४० महिला सहभागी होणार आहेत, अशा ९८ महिला बचत गटांच्या एकूण ४०० महिलांच्या सहभागाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यापूर्वी ताडोबा वन परिक्षेत्रातील ११ गावांतील १७८ महिला बचत गटांच्या ४४५ महिला या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या.

समृद्ध वनाचे संवर्धन व संरक्षण पिढ्यानपिढ्या स्थानिक समुदायाने केले आहे. यामध्ये महिलांचे विशेष योगदान आहे. वनावर स्थानिकांचा अधिकार महत्वपूर्ण आहे. त्यामुळे भरारीच्या माध्यमातून महिलांना जंगलाची माहिती, भ्रमंती तसेच ओळख करून दिली जाणार आहे. हा उपक्रम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उपसंचालक (बफर) कुशाग्र पाठक, आनंद रेड्डी (कोर) यांच्या विशेष योगदानातून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे समन्वयक व प्रशिक्षक प्रफुल्ल सावरकर हे आहेत. कार्यशाळेसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण गोंड, संतोष थिपे, चिवंडे, वनपाल कामठकर, सोयाम, जुमडे तसेच क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान आहे.

...असा आहे उपक्रम

स्थानिक बफर क्षेत्रातील महिलांना ताडोबा वनाचे स्थानिक समुदायांच्या आयुष्यातील महत्व, मानव - प्राणी संघर्ष टाळण्यासाठी घेण्यात येणारी काळजी, शासकीय व इतर यंत्रणेमार्फत पर्यायी रोजगाराच्या संधी या महत्वपूर्ण विषयांवर चर्चा व सादरीकरण करण्यात येते आणि स्थानिक महिलांकरिता ताडोबा वनभ्रमंतीसुध्दा करण्यात येते.
स्थानिक समुदाय वनाचा महत्वपूर्ण घटक असून, वनाचे व वन्यजिवांचे संवर्धन व संरक्षण स्थानिकांचा महत्वपूर्ण सहभागाने परिपूर्ण होऊ शकते. अशा विविध उपक्रमांतर्गत ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प स्थानिक समुदायाला पाठबळ देऊन त्यांच्याकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम नियमित राबवितात.
 

Web Title: Tadoba Bharari activity of forest and wildlife conservation for Self Help Womens Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.