चंद्रपुरात आजपासून ताडोबा महोत्सव; अभिनेत्री हेमामालिनी, रविना टंडन येणार
By राजेश मडावी | Published: February 29, 2024 04:02 PM2024-02-29T16:02:52+5:302024-02-29T16:03:29+5:30
तीन दिवस मेजवाणी : अभिनेत्री हेमामालिनी, रविना टंडन उपस्थित राहणार
चंद्रपूर : देश-विदेशातील पर्यटकांना व्याघ्र दर्शनाची हमखास खात्री असलेल्या प्रसिद्ध ताडोबा-अंधारी प्रकल्पाच्या वतीने चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राउंडवर शुक्रवार (दि.१) पासून तीनदिवशीय ताडोबा महोत्सव आयोजित करण्यात आला. रविवारी (दि.३) महोत्सवाचा समारोप होणार आहे.
राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन्यजीव संरक्षण, पर्यटन व स्थानिक नैसर्गिक वारशाला चालना देण्यास नावीण्यपूर्ण विविध उपक्रम राबविण्याची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेला अनुसरून ताडोबा व्यवस्थापन व वन विभाग सज्ज झाला आहे.
महोत्सवासाठी अभिनेत्री हेमामालिनी, रविना टंडन, गायिका श्रेया घोषाल उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी पहिल्या दिवशी वन्यजीव संवर्धनावर विविध चर्चासत्र व प्रदर्शन होणार आहे. या सत्रांमध्ये ग्रामविकास समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच मानव-वन्य प्राणी संघर्ष कमी करण्याबाबत चर्चा करतील. यावेळी निसर्ग प्रश्नमंजूषाही होईल. सायंकाळी उद्घाटन सोहळ्याला वन्यजीव सद्भावना दूत व सिनेअभिनेत्री रविना टंडन विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सायंकाळी पार्श्वगायिका श्रेया घाेषाल यांची संगीत संध्या होणार आहे. शनिवारी (दि.२) छायाचित्र कार्यशाळा, संवर्धन दौड, कुमार विश्वास यांचे कविसंमेलन व रिकी केज यांच्या गीतांचा कार्यक्रम होईल. रविवारी (दि.३) ट्रेझर हंट, चित्रकला स्पर्धा, सीएसआर परिषद, प्रश्नमंजूषा तसेच समारोप कार्यक्रमाला खासदार व प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांचा गंगा बॅलेट नृत्याविष्कार पाहायला मिळणार आहे. वन्यजीव संवर्धन व मानवी सहजीवनावर आधारीत ताडोबा महोत्सवात नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा व मुख्य वनसंरक्षक तथा ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले.