ताडोबात स्थानिक व बाहेरच्या वादात पर्यटकांचा हिरमोड, १८ जिप्सींना प्रवेश नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2022 01:28 PM2022-01-02T13:28:26+5:302022-01-02T13:38:02+5:30
ताडोबातील मोहर्ली गेटवरून जाणाऱ्या जिप्सींना पूर्वसूचना न देता वेळेवर स्थानिक व बाहेरच्या जिप्सी असा वाद निर्माण करून १८ जिप्सी टॅबवर नसल्याच्या कारणाने त्या गाड्यावरील पर्यटकांना उतरवून दुसऱ्या जिप्सीमध्ये बसविण्यात आले.
चंद्रपूर : वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबात मोहर्ली गेटवर ताडोबा व्यवस्थापनाच्या टॅबवर नसलेल्या १८ जिप्सींना वेळेवर ताडोबात प्रवेश नाकारल्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पर्यटकांना पाऊणतास उशिरा ताडोबात सफारीसाठी जावे लागले. त्यामुळे पर्यटकांचा काही काळ हिरमोड झाला होता.
नाताळ व नवीन वर्षाच्या सुट्या असल्याने ताडोबातील सहाही गेटवर बुकिंग फूल होती. शनिवारी दुपारी सत्रात ताडोबातील मोहर्ली गेटवरून जाणाऱ्या जिप्सींना पूर्वसूचना न देता वेळेवर स्थानिक व बाहेरच्या जिप्सी असा वाद निर्माण करून १८ जिप्सी टॅबवर नसल्याच्या कारणाने त्या गाड्यावरील पर्यटकांना उतरवून दुसऱ्या जिप्सीमध्ये बसविण्यात आले.
व्यवस्थापनाच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे जिप्सी चालक संतापले व कुठलीही जिप्सी ताडोबात जाणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे मोहर्ली गेटवर चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने तब्बल पाऊणतास उशिराने पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पामध्ये जावे लागले. या प्रकारामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.
रविवारी सकाळी असा प्रकार घडला तर रविवारी एकही जिप्सी पर्यटनासाठी जंगलात जाणार नसल्याची माहिती जिप्सी चालकांनी दिली. यावर तोडगा काढण्यासाठी रविवारी जिप्सी चालक व ताडोबा व्यवस्थापन यांच्यामध्ये बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.