ताडोबा व्यवस्थापनाने रेस्क्युू सेंटरचा प्रस्ताव पाठवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:25 AM2021-02-12T04:25:59+5:302021-02-12T04:25:59+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात रेस्क्यू सेंटरचा प्रस्ताव तयार करण्याबाबत राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या ठरावानुसार सदर ...
चंद्रपूर : जिल्ह्यात रेस्क्यू सेंटरचा प्रस्ताव तयार करण्याबाबत राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या ठरावानुसार सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात यावा असे नमूद केल्यामुळे सदर प्रस्ताव ताडोबा व्यवस्थापनाने त्वरित तयार करण्याची मागणी इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी केली आहे.
जिल्ह्यात वाघ व इतर वन्यप्राण्यांची संख्या मानव व वन्यप्राणी संघर्ष लक्षात घेता येथील तात्पुरता वन्यप्राणी निवारा केंद्राचा दर्जा वाढवून ‘रेस्क्यू सेंटर’ तयार करण्यासाठी राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य तथा मानद वन्यजिव रक्षक बंडु धोतरे यांनी शासनाला निवेदन दिले होते. टीटीसीचा दर्जा वाढवून रेस्क्यू सेंटर तयार करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले होते.
यांसदर्भात पार पडलेल्या राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीत चंद्रपूर येथील मानव-वन्यप्राणी संघर्ष यावर चर्चेदरम्यान वन्यजीव मंडळापुढे चंद्रपूर जिल्हातील टीटीसीचा दर्जा वाढवुन रेस्क्यू सेंटर तयार करण्याची गरज स्पष्ट केली. जिल्ह्याची गरज ओळखून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चंद्रपूर येथे रेस्क्यू सेंटरचा प्रस्ताव तयार करण्यास मंजुरी प्रदान केली.
राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या निर्णयानुसार चंद्रपूर येथील प्रस्तावीत रेस्क्यू सेंटरचा प्रस्ताव तयार करून तो पुढील मान्यतेकरिता केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधीकरणाकडे पाठविण्यात यावा या मागणीचे निवेदन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगावकर यांच्याकडे बंडू धोतरे यांनी केली आहे.