‘ताडोबा’त होणार १०४ एकर खासगी जमिनीचा समावेश; देशातील पहिला करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 11:43 AM2021-07-31T11:43:08+5:302021-07-31T11:43:41+5:30
Chandrapur News ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली बफर क्षेत्रातील खासगी १०४ एकर (४३ हेक्टर) जमीन सामूहिक निसर्ग संरक्षणाशी जोडण्याचा करार संबंधित जमीनधारकांशी करण्यात आला आहे.
राजेश भोजेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांची वाढती संख्या लक्षात घेता उद्भवलेल्या मानव-वन्यजीव संघर्षावर मात करण्यासाठी ताडोबा व्यवस्थापनाने राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी सीएनजी (सामूहिक निसर्ग संरक्षण) याेजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली बफर क्षेत्रातील खासगी १०४ एकर (४३ हेक्टर) जमीन सामूहिक निसर्ग संरक्षणाशी जोडण्याचा करार संबंधित जमीनधारकांशी करण्यात आला आहे.
खासगी जमीन मालकांनी शेती कसत नसलेल्या वा अन्य जमिनीवर वन्यजिवांना मुक्त संचारासाठी या करारानुसार परवानगी दिलेली आहे. या जमिनीवर वनविभागामार्फत वन्यजिवांचे व्यवस्थापन व संरक्षण केले जाणार आहे. यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प एकरी दरवर्षी पाच हजार रुपये जमीनधारकांना देणार आहे. ही देशातील पहिलीच योजना आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जमीनधारक, ताडोबा फाउंडेशन व खासगी इको-टुरिझम गुंतवणूकदार यांच्यात त्रीपक्षीय करार झालेला आहे. बहुतांश जमीन पडलेली असून, खडकाळ आहे. या करारामुळे मात्र जमीनमालकांना वहिवाटीत नसलेल्या जमिनीचा लाभ मिळणार आहे. ही जमीन खासगी कशी झाली हा संशोधनाचा विषय आहे.
२०१५ मध्ये राज्य सरकारने सुरू केली सीएनसी योजना
२१ ऑक्टोबर २०१५ मध्ये राज्य सरकारने सीएनसी योजना लागू केली आहे. राज्यातील ५८ संरक्षित क्षेत्रातील ६ राष्ट्रीय उद्याने, ४८ अभयारण्ये, ४ संरक्षित क्षेत्र मजबूत करणे, खासगी जमिनीचा वापर करून वन्यजीव व वाघांचा काॅरिडाॅर सुरक्षित करणे हा या मागील मुख्य उद्देश आहे.
ही महत्त्वपूर्ण योजना अमलात आणण्याचा निर्णय ताडोबा व्यवस्थापनाने घेतलेला आहे. ही जमीन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील आहे. वाघांची वाढती संख्या लक्षात घेता ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. बुडुकदेव हे प्रसिद्ध जलकुंडही याच परिसरात आहे. या करारामुळे जमीनधारकांच्या अधिकारात काहीही बदल होणार नाही. ते दुसऱ्या व्यक्तीसोबत मिळून इको टुरिझमही विकसित करू शकतात. ते त्याचा आर्थिक लाभही घेऊ शकतात. मात्र, त्यानंतर ताडोबा फाउंडेशनकडून रक्कम देणे बंद होईल. हा परिसर वाघ व अन्य प्राण्यांना संचार करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
- जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर.