ताडोबातील ‘माया’ने घातली मायानगरीच्या अभिनेत्रीला भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:22 PM2018-03-26T23:22:31+5:302018-03-26T23:22:31+5:30
एकापेक्षा एक अजरामर चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ज्येष्ठ सिनेअभिनेत्री वहिदा रहेमान यांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘माया’ वाघिणीने भुरळच घातली.
राजेश भोजेकर/राजकुमार चुनारकर।
आॅनलाईन लोकमत
कोलारा गेट(ताडोबा) : एकापेक्षा एक अजरामर चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ज्येष्ठ सिनेअभिनेत्री वहिदा रहेमान यांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘माया’ वाघिणीने भुरळच घातली. वय वर्षे ८० असतानाही विदर्भाच्या कडक उन्हात त्या सतत तीन दिवस जंगलभ्रमंतीवर होत्या. ताडोबातील व्याघ्र दर्शन आणि जंगल सफारीने आनंदून गेल्या. ताडोबा हे देशातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्याची प्रतिक्रिया त्यांनी सोमवारी सफारीहून परत आल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना दिली.
नागपुरात गेल्या आठवड्यात ‘लोकमत’च्या सूर जोत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यासाठी सिनेजगतातील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान व गायक रुपकुमार राठोड आवर्जून उपस्थित होते. यानंतर ते मुंबईला परत न जाता शनिवारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाले. एका रिसोर्टमध्ये मुक्काम करून व्याघ्र दर्शन व जंगलभ्रमंतीचा मनसोक्त आनंद लुटला. पहिल्याच दिवशी पर्यटकांवर भुरळ घालणाºया ‘माया’ वाघिणीचे निवांत दर्शन घडल्याने वनभ्रमंतीचा आनंद द्विगुणीत झाला. सतत तीन दिवस जंगलसफारीवर होते. ताडोबा ख्यातीप्रमाणेच आहे. येथे वाघ बघण्याचा आनंद काही ओरच. ताडोबा हे एक निसर्गरम्य ठिकाणही आहे, असेही वहिदा रहेमान म्हणाल्या.
वनमंत्र्यांनी केलेल्या सुधारणांचे कौतुक
ताडोबा हे देशातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे, असेही वहिदा रहेमान म्हणाल्या. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक सुधारणा येथे आपणाला कळले. त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांना व्याघ्र दूत बनवून योग्यच केले. वाघ बचाव मोहिमेला गती मिळेल. पर्यटनात वाढ होईल, असे सांगतानाच अमिताभ बच्चन यांची मी मोठी फॅन आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ताडोबाचे निसर्गरम्य वातावरण व ‘माया’च्या निवांत दर्शनाने आपण समाधानी असल्याचेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वीय सहाय्यक शैलेश बैस यांच्या मार्फतीने वन्यजीव रक्षक अमोल बैस यांनी टिपलेले माया वाघिणीचे तिच्या बछड्यांसोबतचे छायाचित्र भेट दिले.